Sanai Chaughade Serial Team : ‘सनई चौघडे’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. ‘झी मराठी’वर ही मालिका ८:३० वाजताच्या प्राइम टाइमला प्रसारित केली जाते. यामधील परब कुटुंब, बहिणींचं नातं, जय-शर्वरीची केमिस्ट्री या सगळ्याच गोष्टी चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळतोय. सध्या ‘सनई चौघडे’ची संपूर्ण टीम कोकणात शूट करतेय.
‘सनई चौघडे’मधील परब कुटुंबीय हे मूळचे कोकणातले आहेत. त्यामुळे कथानकाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच या मालिकेचं शूटिंग आसरोंडी गावी पार पडलं. याचे फोटो अन् व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ‘सनई चौघडे’ची संपूर्ण टीम कोकण रेल्वेचा प्रवास करून कणकवली येथे पोहोचली होती. जय खानोलकर, शर्वरी, गौतम, आसावरी, साक्षी, आकाश, समायरा, मॅक या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची झलक फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. याचबरोबर आता ‘सनई चौघडे’च्या टीमचा कोकणातील एक खास व्हिडीओ समोर आला आहे.
कोकणी संस्कृतीत लोककलेला विशेष स्थान आहे. शक्तीतुरा ही कोकणातील अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक लोककला आहे, जी प्रामुख्याने गणेशोत्सवाच्या काळात ढोलकी, तबल्याच्या तालावर सादर केली जाते. याची झलक प्रेक्षकांना ‘सनई चौघडे’च्या आगामी भागात पाहायला मिळेल. शूटिंग संपल्यावर या सगळ्या कलाकारांनी गावच्या खळ्यात कोकणी लोकगीतांवर बाल्या डान्स केला. याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
‘सनई चौघडे’ मालिकेतील सगळे कलाकार एकत्र डान्स करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. गावकऱ्यांना सुद्धा त्यांचा हा साधेपणा, आपुलकीचा स्वभाव भावला आहे. या कलाकारांवर सोशल मीडियावर सुद्धा कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
दरम्यान, कोकणात शूटिंग पार पडल्यामुळे आता लवकरच या मालिकेत काहीतरी खास घडणार आहे. आता प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार, मालिकेत कोणता ट्रॅक सुरू होणार हे मालिकेचा आगामी प्रोमो पाहून स्पष्ट होईल. विशेषत: ‘शायनर जय’ आणि ‘Rose क्वीन शर्वरी’ यांची लव्हस्टोरी कोणतं वळण घेणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. ‘सनई चौघडे’ मालिका झी मराठीवर रात्री ८:३० वाजता प्रसारित केली जाते.
