यंदाच्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात ‘सनई चौघडे’ मालिकेने बाजू मारली असून सर्वोत्कृष्ट मालिकेसह, सर्वोत्कृष्ट नायिका, जोडी, कुटुंब, लक्षवेधी चेहरा अशा बऱ्याच अवॉर्ड्सवर या मालिकेतील कलाकारांनी आपलं नाव कोरलं आहे. यामध्ये शर्वरी परब ही भूमिका लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी साळवी साकारत आहे. पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार जिंकल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

सर्वोत्कृष्ट नायिका हा पुरस्कार जिंकल्यावर, आनंद व्यक्त करताना चिन्मयी म्हणाली, “झी मराठी अवॉर्ड्स २०२६ हा माझ्यासाठी खूप खास अनुभव होता. एका मोठ्या मंचावर आपल्या कामाची दखल घेतली जातेय, याचा आनंद होता. त्याचबरोबर मनात उत्सुकता आणि थोडी धाकधूकही होती. ‘सनई चौघडे’ या मालिकेला आणि माझ्या भूमिकेला प्रेक्षकांचं जे प्रेम मिळत आहे, त्यामुळे हा अनुभव आणखी खास झाला. माझ्या कुटुंबाचा आशीर्वाद, संपूर्ण टीमची मेहनत आणि प्रेक्षकांचं प्रेम यामुळे हा क्षण कायम माझ्या लक्षात राहील.”

“लहानपणापासून मी अवॉर्ड्सचे कार्यक्रम पाहायचे. त्या वेळी हिरोइन्सना स्टेजवर नृत्य करताना पाहून आपणही एक दिवस असं परफॉर्म करावं, असं मला वाटायचं. मी अनेक वर्षं नृत्य करतेय, पण हे स्वप्न कधी पूर्ण झालं नव्हतं. यावर्षी ‘झी मराठी’मुळे मला ही संधी मिळाली. Best Actress चा पुरस्कार मिळणं माझ्यासाठी खूप खास होतं. हातात ट्रॉफी घेतल्यावर आजवरचा संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोर आला. माझ्या कुटुंबाने नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला, मला साथ दिली आणि माझ्यासाठी प्रार्थना केल्या. त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्यावर त्यांचा आनंद पाहून मला खूप भरून आलं. मी ट्रॉफी घेऊन घरी गेले, तेव्हा माझे काका, बाबा, काकी, आई, भाची, दादा आणि वहिनी या सगळ्यांनी माझं खूप छान स्वागत केलं. सगळे नाचत होते. अगदी ट्रॉफी डोक्यावर घेऊनही नाचत होते! ते पाहून मला खूप आनंद झाला. खरं सांगायचं तर, पुरस्कार मिळाल्याचा आनंद होताच; पण माझ्या घरच्यांचा आनंद पाहून मला त्याहून जास्त आनंद झाला.”

“हा पुरस्कार केवळ माझा नाही. आजवरचे माझे सहकलाकार, दिग्दर्शक, DOPs, निर्माते आणि सेटवरच्या प्रत्येक व्यक्तीची मला मोलाची साथ मिळाली आहे. त्यांच्या मदतीमुळे आणि प्रेमामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी माझ्या कुटुंबाला, संपूर्ण ‘सनई चौघडे’च्या टीमला आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षकांना समर्पित करते.” असं चिन्मयीने सांगितलं.