Sanai Chaughade Fame Chinmayee Salvi HomeTown : गणपतीचा सण म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमान्यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात मोठी गर्दी केली होती. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सुद्धा मूळचे कोकणातले आहेत. हे सगळे कलाकार सुद्धा व्यग्र शूटिंगमधून वेळ काढून गावी कोकणात पोहोचले होते. ‘सनई चौघडे’ मालिकेच्या निमित्ताने यंदा संपूर्ण महाराष्ट्राला परब कुटुंबाचा गणेशोत्सव पाहायला मिळाला होता. याचं शूटिंग सुद्धा कोकणात आसरोंडीमध्ये पार पडलं होतं. हे शूटिंग पूर्ण झाल्यावर मालिकेतील कलाकार आपल्या घरच्या बाप्पाच्या स्वागतासाठी परतले.
‘सनई चौघडे’ची मुख्य नायिका शर्वरी म्हणजेच अभिनेत्री चिन्मयी साळवी हे शूटिंग संपताच आपल्या मूळ गावी संगमेश्वरला गेली. येथील पारंपरिक गणेशोत्सवाचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘गावचा गणपती २०२६’ असं कॅप्शन देत शरुने आपल्या गावचा बाप्पा आणि तिच्या खऱ्या ऑफस्क्रीन कुटुंबाची झलक सर्वांना दाखवली आहे.
चिन्मयीचं संपूर्ण कुटुंब, गावचं भजन, गौरी आवाहन, बाप्पाचा नैवेद्य, कोकणातील निसर्गरम्य वातावरण, पारंपरिक विसर्जन सोहळा याची झलक अभिनेत्रीच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आजही कोकणात परंपरा-संस्कृती जपून प्रत्येक सण साजरे केले जातात. त्यामुळे चिन्मयीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
“वॉव किती सुंदर आहे सगळं बाप्पा मोरया”, “गावचं गणपती सेलिब्रेशन मस्तच असतं”, “मालिकेमध्ये जशी आहे तशीच शर्वरी ऑफस्क्रीन सुद्धा आहे…याचं विशेष कौतुक आहे”, “चिन्मयी खूपच छान”, “यंदा कोकणात दोनदा जाणं झालं तुझं… गणेशोत्सवही मालिकेच्या निमित्ताने दोनदा साजरा केलास…बाप्पाची कृपा”, “किती छान” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, चिन्मयी आणि राज यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘सनई चौघडे’ मालिका झी मराठीवर रात्री ८:३० वाजता प्रसारित केली आहे. यामधील शर्वरी-जयच्या जोडीची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे.
