Sanai Chaughade Fame Actress Mansi Natekar : सात दिवसांच्या लाडक्या बाप्पाला आणि गौराईला नुकताच भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. यंदा गौरी-गणपतीचा सण साजरा करण्यासाठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार गावी कोकणात पोहोचले होते. ‘सनई चौघडे’ या मालिकेमुळे सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री मानसी नाटेकर सुद्धा बाप्पाच्या स्वागतासाठी गावी गेली होती. रत्नागिरीतील नाटे हे तिचं गावं! अभिनेत्रीचं गाव समुद्र किनारपट्टीवर वसलेलं आहे. तिच्या गावच्या घरातून सुद्धा अगदी सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो.
‘सनई चौघडे’ मालिकेत मानसी ‘समायरा’ या खलनायिकेची भूमिका साकारत आहे. नुकतीच गणपतीनिमित्त ती गावी गेली होती. पहाटे बरोबर पावणे पाच वाजता तिने आपला गावचा प्रवास सुरू केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मानसी गणपतीच्या पहिल्या दिवशी पहाटेच गावी निघाल्यामुळे तिला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला नाही.
जवळपास १० ते ११ तासांचा प्रवास करून, मध्ये नाश्ता-जेवणासाठी ब्रेक घेऊन ती ४:१५ वाजता गावी पोहोचली. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गावची घरं, निसर्गरम्य वातावरण, समुद्रकिनारे, मुंबई-गोवा महामार्गाची झलक पाहायला मिळत आहे.


तसेच दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने तिच्या घरातून दिसणारा समुद्राचा सुंदर व्ह्यू देखील दाखवला आहे. गावी पोहोचल्यावर मानसीने मोठ्या भक्तीभावाने बाप्पाची पूजा केली. गावचं भजन, विसर्जन, आजूबाजूचा परिसर तसेच मानसीने समुद्रकिनारी खास फोटोशूट केल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मानसीने शेअर केलेल्या कोकण ट्रिपचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
