दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, घरभर दरवळणारा फराळाचा सुगंध, सुंदर रांगोळी, आकाशकंदील आणि कुटुंबासह घालवलेले आनंदाचे क्षण आठवतात. प्रत्येकाच्या मनात दिवाळीच्या अनेक आठवणी असतात. झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ या मालिकेत पमाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मेघना एरंडेसाठी देखील दिवाळी हा खास सण आहे. लहानपणी शिवाजी पार्कमध्ये आई-वडिलांसह साजरी केलेली दिवाळी, भाच्यासोबत कंदील बनवण्याच्या आठवणी, फराळाविषयीचं प्रेम आणि सासरच्या मंडळींनी जपलेली दिवाळी साजरी करण्याची खास पद्धत, अशा अनेक आठवणींना तिने उजाळा दिला.
मेघना एरंडे सांगते, “लहानपणी माझी दिवाळी शिवाजी पार्कला आईकडे साजरी व्हायची आणि आम्ही खूप धमाल करायचो. दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्हाला खूप अभ्यास मिळायचा. त्यासाठी वेगळी वही बनवावी लागायची. ती वही सजवायला मला खूप मजा यायची. बाबा तेव्हा आमच्यासाठी थोडेसे फटाके आणायचे. फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये लहान मुलं काम करतात, त्यांना किती त्रास सहन करावा लागतो, फटाके बनवतानाचं केमिकल त्यांच्या फुफ्फुसात जाऊ शकतं आणि त्यांना किती कष्ट करावे लागतात, यावर आधारित एक डॉक्युमेंटरी मी लहानपणी डब केली होती. त्या डॉक्युमेंटरीसाठी मी फटाक्यांचा कारखानाही पाहिला होता. त्याचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की तेव्हापासून आजपर्यंत मी कधीच फटाके फोडत नाही. त्या मुलांसाठी मला खूप वाईट वाटलं होतं.”
मेघना पुढे सांगते, “मी घरी सांगून टाकलं होतं की, यापुढे मी कधीच फटाके उडवणार नाही. माझ्या कुटुंबालाही माझी ही भूमिका पटली. त्यामुळे लहानपणापासूनच मला फटाके उडवायला आवडत नाहीत. मी सासरी फटाक्यांबद्दल सांगितलं, तेव्हा माझा नवरा विक्रम म्हणाला की, ठीक आहे, आपण आवाजाचे फटाके कधीच आणायचे नाहीत. पण इला झाल्यानंतर तिलाही फटाक्यांचा अनुभव मिळावा म्हणून छोटेसे भुईचक्र, अनार वगैरे आणू. मोठे बॉम्ब वगैरे फोडायचे नाही. मला फटाक्यांच्या धुराचाही त्रास होतो. त्यामुळे मी शक्यतो फटाक्यांपासून लांबच राहते.”
“दादरमध्ये दिवाळी सुरू होण्याआधीच दिवाळीचं वातावरण तयार झालेलं असतं. सगळीकडे झगमगाट, शॉपिंगची लगबग, मोठमोठे कंदील आणि गजबजलेली बाजारपेठ, हे सगळं मला खूप आवडायचं. दादरमध्ये मिळालेला तो अनुभव मला वाटतं, इतर कुठेही मिळू शकणार नाही. खूप शॉपिंग करणं, मॅचिंग कपडे घेणं, हे सगळं असायचं. दिवाळीसाठी चपलेपासून टिकलीपर्यंत, बांगड्या आणि कानातल्यांपर्यंत सगळं मॅचिंग घेतलं जायचं. तेव्हा दिवाळी म्हणजे खरोखरच दिवाळी असायची. आजही आहे आणि अशीच राहील.” असं मेघनाने सांगितलं.
माहेर अन् सासरी दिवाळी कशी साजरी केली जाते यावर मेघना म्हणाली, “जवळपास २८-२९ वर्षं माझी दिवाळी आई-वडिलांकडेच साजरी झाली. त्यानंतर गेली १६ वर्षं आम्ही विक्रमच्या घरी, म्हणजे जोशी कुटुंबात दिवाळी साजरी करतो. माझ्या सासूबाईंनी एक खूप चांगला पायंडा पाडला आहे. आमचे जेवढे नातेवाईक आहेत, त्या प्रत्येकाच्या घरी दिवाळीचा एक दिवस साजरा करायचा, असं ठरलेलं असतं. प्रत्येकाच्या घरी एक दिवस सगळ्यांनी एकत्र जमायचं. लक्ष्मीपूजन आमच्या घरी असतं, तर इतर दिवशी सगळे नातेवाईक एकमेकांकडे जेवायला जातात.”
