‘सनई चौघडे’ मालिकेची संपूर्ण टीम काही दिवसांपूर्वी शूटिंगसाठी कोकणात गेली होती. गणेशोत्सवाचे विशेष भाग याठिकाणी शूट करण्यात आले होते. आता संपूर्ण टीम एकत्र आऊटडोअर शूटिंगला गेलीये म्हटल्यावर अनेक गमतीजमती घडतात. यादरम्यानचा खास किस्सा अभिनेता राज हंचनाळे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.

जय खानोलकरची भूमिका साकारणाऱ्या राज हंचनाळे याने चिन्मयी ( शर्वरी ) आणि पालवी ( साक्षी ) या दोघींवर प्रँक केला होता. या प्रँकमुळे या दोघीजणी इतक्या घाबरल्या की, पालवी तर रडूच लागली होती असं राजने सांगितलं.

राज ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना म्हणाला, “शूटिंगसाठी कोकणात जाताना आम्ही सगळे ट्रेनने जात होतो. रात्रीची ट्रेन होती आणि सगळेजण जागे होते…तेव्हा मग भूताच्या गोष्टी सांगायच्या असं ठरलं. आता आमच्यात जे कोकणातले होते, त्यांनी आधी भूताच्या गोष्टी सांगितल्या आणि जेव्हा माझी वेळ आली, तेव्हा या मुलींचं लक्षच नव्हतं…नंतर मला चिडवत सुद्धा होत्या. मी तेव्हा यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मग आमचा पुढचा कोकणातला प्रवास सुरू झाला.”

राज पुढे सांगतो, “आमचे जे ड्रायव्हर दादा होते, त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहायला होतो त्याच्या विरुद्ध दिशेला एक नदी होती. त्या नदीवरून जाताना दादांनी आम्हाला सांगितलं की, काही वर्षांपूर्वी याठिकाणी दुर्घटना झाली होती. एका भजनी मंडळाचा तिथे अपघात झाला होता आणि त्या जागेवर मध्येच भजनांचा आवाज येतो…आता खरं-खोटं माहिती नाही. पण, हे ऐकून मग सेटवर पोहोचेपर्यंत माझ्या डोक्यात एक प्लॅन तयार झाला. आम्ही पॅकअप झाल्यावर हॉटेलवर परत आलो. रात्री मी हा प्लॅन आमच्या मालिकेतले गौतम, मॅक आणि आकाश यांना सांगितला. आमच्या बरोबर खाली जी रूम होती, ती चिन्मयी आणि पालवीची होती. आम्ही एका दोरीच्या साहाय्याने छोटा स्पीकर खाली सोडला आणि त्यावर मध्यरात्री अडीच वाजता भजन वाजवलं. आता नेहमी मी रात्री ९:३० वाजता झोपतो त्यामुळे या दोघींना माझ्यावर शंका येईल, याचा काहीच चान्स नव्हता.”

sanai chaughade jay sharvari
जयने शर्वरीवर केलेला प्रँक

अभिनेता म्हणतो, “थोड्यावेळाने या दोघींचा मिस्ड कॉल मला फोनवर दिसला. पण, आम्ही सगळे झोपून गेलो. सकाळी साडेसहा वाजता मला हिचा फोन आला अगदी हळू आवाजात बोलत होती, “अरे राज मला ते भजन ऐकायला आलं” तिला ‘भजन’ हा शब्द सुद्धा तिला स्पष्ट म्हणता येत नव्हता, एवढी ती घाबरली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ही सेटवर सगळ्यांना सांगत होती की, मला रात्री भजन ऐकू आलं. त्यानंतर चौथ्या दिवशी आमच्यापैकी काही जणांचं पॅकअप होणार होतं. तेव्हा आम्ही पहाटे साडेपाचला हॉटेलवर आलो होतो. तेव्हा मग मी मॅक आणि आकाशला यांच्या रूममध्ये पाठवलं होतं, जेणेकरून मी वरून पुन्हा भजन वाजवतो आणि कोणालाही डाऊट येणार नाही.”

Sanai Chaughade Serial Update
जय-शर्वरी

“या सगळ्यांना परत वाटलं की मी झोपलो मी साडेपाच वाजता दोरी सोडली आणि पुन्हा भजन लावलं, ‘ऐका सत्यनारायणाची कथा’! चिन्मयी आणि पालवी इतक्या घाबरल्या की उशा वगैरे घेऊन वरच्या खोलीत आल्या. पालवी तर रडायला लागली होती. म्हणत होत्या…आम्ही या रूममध्ये राहणारच नाही. शेवटी माझ्या रूममध्ये आल्या, मी स्पीकर तिथेच ठेवला होता आणि या जशा रूममध्ये आल्या…तसं मी पुन्हा भजन लावलं ‘ऐका सत्यनारायणाची कथा’!” असा भन्नाट किस्सा राजने सांगितला आहे.