Sanai Chaughade upcoming twist: परब कुटुंब आणि खानोलकर कुटुंब यांच्यातील वादविवाद कायमच लक्ष वेधून घेत असतात. सनई चौघडे या मालिकेतील ही कुटुंबे कायमच लक्ष वेधून घेत असतात. त्यांच्यात सतत काही ना काही सुरू असल्याचे पाहायला मिळते.
झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या सनई चौघडे मालिकेत दाखविल्याप्रमाणे परब हे मध्यमवर्गीय कुटुंब आहे. सुभाष व पमा यांना चार मुली आहेत. त्यांनी त्यांना कष्टाने वाढवले आहेत. सुभाष कंडक्टर म्हणून काम करतात, तर पमा म्हणजेच प्रमिलाचा केटरिंगचा व्यवसाय आहे. ते स्वामी भक्त आहेत. त्यांच्या चारही मुली चांगल्या स्वभावाच्या, आई-वडीलांचा आदर करणाऱ्या आणि संकटांना धैर्याने सामोरे जाणाऱ्या अशा आहेत.
दुसरीकडे खानोलकर कुटुंब आहे. तेजस्विनी खानोलकर ही यशस्वी उद्योजिक आहे. उद्योग विश्वात तिचे नाव आहे. तिला दोन मुले आहेत. जय आणि गौतम अशी त्यांची नावे आहेत. जयने आईप्रमाणेच उद्योग विश्वात त्याची ओळख निर्माण केली आहे. तो कंपनीसाठी दिवसरात्र कष्ट करताना दिसतो. तर गौतम लहान असल्याने सर्वांचा लाडका आहे.
परब कुटुंबातील मोठी मुलगी आसावरी आणि खानोलकर कुटुंबातील लहान मुलगा गौतम हे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. त्यांच्या प्रेमामुळे मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. तेजस्विनीला हे लग्न मान्य नाही. तिला परब कुटुंबाबरोबर कोणतेही नाते नको आहे. मात्र, मुलांसाठी तिने या लग्नाला होकार दिला आहे. मात्र, हे लग्न मोडण्यासाठी ती अनेक प्रयत्न करत आहे.
शर्वरी व जयमध्ये जवळीक वाढणार
आता तेजस्विनीचा मोठा मुलगा जय आणि परब कुटुंबातील दुसरी मुलगी शर्वरी यांच्यात जवळीक वाढताना दिसणार आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सनई चौघडे मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत पाहायला मिळते की जय व शर्वरी एका पार्टीत गेले आहेत. शर्वरीने या पार्टीसाठी खास लूक केला आहे. जेव्हा शर्वरीची एन्ट्री होते, त्यावेळी जयची नजर तिच्यावर खिळते. पुढे पार्टीत जोडप्यांना एक टास्क दिला जातो. पेपर फोल्डिंग टास्कमध्ये शेवटी जय शर्वरीला उचलून घेतो. त्यांची जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेते. काजल काटेची झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सोशल मीडियावर नात्याला मिळणार नवे नाव, पार्टीवाली लव्हस्टोरी खाऊन जाणार भाव”, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, जयला मुली आवडत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याची व शर्वरीची मैत्री होताना दिसत आहे. आता त्यांची लव्हस्टोरी सुरू होणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
