Zee Marathi Sanai Chaughade Serial Updates : ‘झी मराठी’ वाहिनीवर १६ मार्चपासून म्हणजेच साधारण तीन महिन्यांपूर्वी ‘सनई चौघडे’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या कौटुंबिक मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी साळवी आणि अभिनेता राज हंचनाळे यांची जोडी प्रमुख भूमिकेत झळकत आहे. गेल्या तीन महिन्यांत या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. याशिवाय ‘सनई चौघडे’चा टीआरपी सुद्धा खूप चांगला आहे. मात्र, नुकतीच या मालिकेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

‘सनई चौघडे’ मालिकेत शर्वरीच्या उमा मावशीच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेत्री सुमेधा दातार झळकत होत्या. मात्र, आता त्यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. उमा मावशी या पात्रासाठी रिप्लेसमेंट करण्यात आली आहे. उमाच्या भूमिकेसाठी आता ‘सनई चौघडे’ मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

sanai chaughade
सनई चौघडे मालिका

याशिवाय ‘सनई चौघडे’ मालिकेचा आणखी दोन कलाकारांनी निरोप घेतला आहे. या दोघांच्याही भूमिका कथानकानुसार संपल्या आहेत. गौतम बांदेकर आणि त्याची बायको अर्चना या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी नुकताच ‘सनई चौघडे’चा निरोप घेतला. या दोघांच्या भूमिका कथानकानुसार मर्यादीत स्वरुपाच्या होत्या.

भर लग्नात गौतमचं सत्य सर्वांसमोर उघड झाल्यामुळे आसावरीचं लग्न मोडतं. गौतमची खरी बायको अर्चना आहे हे सुद्धा आता सर्वांना समजलेलं आहे. त्यामुळे गौतम-अर्चना या दोन्ही पात्रांनी मालिकेचा निरोप घेतला आहे. या भूमिका अनुक्रमे अभिनेता कुणाल धुमाळ आणि अभिनेत्री हर्षदा बोरगे हे कलाकार साकारत होते.

गौतम बांदेकरची भूमिका साकारणाऱ्या कुणालने भावुक पोस्ट शेअर करत सर्वांचा निरोप घेतला आहे. कुणाल लिहितो, “या आमच्या सेटवरच्या सगळ्या अप्रतिम लोकांबद्दल मी आणखी काय सांगू? हा अनुभव खरंच खूप छान होता. गौतम बांदेकरच्या भूमिकेचा शेवट झालाय, लग्नाच्या सीक्वेन्समध्ये माझ्या भूमिकेचा शेवटचा भाग होता. त्यामुळे हा क्षण, हा दिवस माझ्यासाठी खूप भावुक करणारा आहे. मी आजवर काम केलेल्या सर्वोत्तम सेटपैकी हा एक ‘सनई चौघडे’चा सेट आहे, यात काहीच शंका नाही! सकारात्मक वातावरण, छान माणसं आणि सर्वत्र असलेली सकारात्मक उर्जा…हे सगळं मी आयुष्यभर जपून ठेवेन. माझ्यावर विश्वास ठेवून या भूमिकेसाठी माझी निवड केल्याबद्दल निर्माते, दिग्दर्शक राजू सावंत सरांचे मनापासून आभार! मला संधी दिल्याबद्दल सर्वांचे आणि झी मराठीचे आभार!”

दरम्यान, ‘सनई चौघडे’ मालिकेतून सुमेधा दातार, हर्षदा आणि कुणाल या तीन कलाकारांची एक्झिट झाली आहे. आता मालिकेत आसावरी आणि गौतम खानोलकरचं लग्न केव्हा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मालिका रात्री ८:३० वाजताच्या प्राइम टाइमला झी मराठीवर प्रसारित केली जाते.