Jui Gogari on Marriage: सध्या ‘सनई चौघडे’ मालिका गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रे हळूहळू प्रेक्षकांची लाडकी होत आहेत. मालिकेतील आसावरी, जय, शर्वरी, गौतम, पमा, सुभाष, तेजस्विनी, आजी अशी सगळीच पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत.

सध्या मालिकेत प्रमिला व सुभाष परब यांची मोठी मुलगी आसावरी व तेजस्विनी खानोलकरचा लहान मुलगा गौतम यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. एकेक कार्यक्रम पार पडत असल्याचे दिसत आहे. गौतम व आसावरी यांचे एकमेकांवर असलेले प्रेम, त्यांची निरागसता, केमिस्ट्री हे प्रेक्षकांना आवडत आहे. प्रेक्षक त्यांच्या जोडीवर कौतुकाचा, प्रेमाचा वर्षाव करीत आहेत.

सनई चौघडे या मालिकेत अभिनेत्री जुई गोगरीने आसावरी ही भूमिका साकारली आहे. नुकतीच जुईने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिला खऱ्या आयुष्यात कसा मुलगा हवा आहे? याबद्दल सांगितले आहे.

“आम्ही पाच बहिणी…”

जुई म्हणाली, “मालिकेतील गौतमसारखा खूप प्रेम करणारा असावा आणि माझ्या कुटुंबाला सपोर्ट करणारा मुलगा हवा. कारण- आम्ही पाच बहिणी आहोत. सगळ्याच बहिणी लग्न करून गेल्या, तर मम्मी-पप्पांना कोण सांभाळणार? त्यांचं काय, असा माझ्या मनात विचार असतो. हे मला आधीपासूनच वाटतं की, असं असायला हवं. आम्हा सगळ्या बहि‍णींना तसंच वाटतं. भलंही त्यांचं लग्न झालं असलं तरी आई-बाबांना त्या मदत करतात. तर माझंही तसंच असलं पाहिजे की, माझ्या होणाऱ्या नवऱ्यानं तर मला या गोष्टींमध्ये पाठिंबा द्यावा. तर मला ही एक गोष्ट त्याच्यामध्ये हवी आहे.”

पुढे ती म्हणाली, “मी बोलकी आहे, बडबडी आहे, तर तो ऐकणारा असावा. जे चांगल्या पद्धतीनं ऐकून घेतात, ते माझ्यासाठी ग्रीन फ्लॅग असतात.”

तुझ्यातील चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, याबद्दल जुई, “मी कोणत्याही गोष्टी सांभाळून घेऊ शकते, नाती सांभाळून घेऊ शकते. माझ्या बाबतीत त्याला टेन्शन घ्यावं लागणार नाही की, मी त्याच्या घरच्यांना कसं सांभाळेन किंवा माझ्याकडून होईल की नाही? मी ती गॅरंटी घेऊ शकते की माझ्याकडून त्यांना काहीच कमी होणार नाही. जसं मी माझ्या घरच्यांसाठी करणार, तसेच त्याच्या घरच्यांसाठीही करणार आणि मला जेवण बनवता येतं”, असे म्हणत तिच्यातील चांगल्या गोष्टी कोणत्या हेही सांगितले.

जुईला पेटिंगचीही आवड आहे. ती सोशल मीडियावर पेटिंग करतानाचे काही व्हिडीओ शेअर करते. दरम्यान, सनई चौघडे या मालिकेत गौतम व आसावरीचे लग्न कधी होणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.