Raj Hanchanale on his newborn baby girl: राज हंचनाळे सध्या ‘सनई चौघडे’ या मालिकेतून सर्वांची मने जिंकत आहे. त्याने साकारलेली जय ही भूमिका लोकप्रिय ठरत आहे. राज मात्र भूमिका किंवा मालिकेमुळे चर्चेत नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राजला मुलगी झाली आहे, हे त्याने त्याच्या एका पोस्टमधून सांगितलं होतं. आता त्याने एका मुलाखतीत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“देवाची कृपा आहे मुलगी जन्माला आली”
राजने नुकताच राजश्री मराठीशी संवाद साधला. या मुलाखतीत त्याला विचारले की पहिल्यांदा बाबा झाल्याची आणि मुलगी झाल्याची भावना काय आहे? यावर तो म्हणाला, “ही खूप कमाल भावना आहे, देवाची कृपा आहे मुलगी जन्माला आली. कारण- मला आणि माझ्या पत्नीला आम्हा दोघांनाही मुलगीच हवी होती. ही खूप सुंदर भावना आहे. मला शब्दांत मांडणंही अवघड जात आहे. १९ तारखेला नवमीच्या दिवशी मुलीचा जन्म झाला, देवाचा आशीर्वाद आहे.”
“येणारा जीव त्याचं प्रारब्ध घेऊन येतो”
पुढे तो म्हणाला, “जेव्हा आम्हाला आम्ही आई बाबा होणार आहे ही बातमी समजली होती, तेव्हाच जबाबदारीची भावना आली होती. मला हेही वाटतं की येणारा जीव त्याचं प्रारब्ध घेऊन येतो. ज्यावेळी ‘सनई चौघडे’ ही मालिका सुरू झाली, त्याचवेळी ही बातमी माझ्याकडे होती. म्हणजे अगदी एक दोन दिवसाचा फरक होता. म्हणजे ही न्यूज आधी आली आणि नंतर माझी निवड झाली, मालिका सुरू झाली; तर मला वाटतं की तिची इच्छा होती की हे काम लोकांपर्यंत इतक्या ताकदीने पोहोचावं.”

“मी कोणालाच सांगितलं नव्हतं, कारण…”
राजने बाप्पाची मूर्ती बाळ गणेशाच्या रूपात का होती, याबद्दलही सांगितले. तो म्हणाला, “बाळगणेशाची मूर्ती त्यासाठीच होती. कारण मी कोणालाच सांगितलं नव्हतं. म्हणजे अगदी मी टीममध्येसुद्धा झी मराठी अवॉर्ड संपल्यानंतर सगळ्यांना स्टेजवर बोलवून तिथे सगळ्यांना सांगितलं. म्हणजे सेटवरही कोणालाच माहीत नव्हतं. कारण- मला यासाठी सांगायचं नव्हतं. कारण- मग चर्चा, बोलणं आणि मग सतत त्यावरच चर्चा होते, मला ते नको होतं.”

पुढे तो म्हणाला, “मला कामाच्या ठिकाणी कामावरच लक्ष द्यायचं होतं आणि जिथे माझं कुटुंब आहे, तिथे मी १०० टक्के देतो, त्यामुळे या दोन्ही गोष्टी मला वेगळ्या ठेवायच्या होत्या. ज्या वेळी मला कळलं की आता आठवडाभर उरलाय, तेव्हा मी सगळ्यांना जमा केलं आणि सांगितलं. सगळे खूप खूश आहेत. सगळ्यांनी माझ्यासाठी खूप प्रार्थना केल्या. सगळ्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत. सध्या मी खूप आनंदी आहे. सगळ्या गोष्टी आयुष्यात व्यवस्थित घडत आहेत. हा कुठे ना कुठे स्वामींचा आशीर्वाद आहे.”

“ती भावना शब्दात मांडणंच अवघड आहे”
पहिल्यांदा मुलीला पाहणं, तिला हातात घेण्याबद्दल राज म्हणाला, “ती भावना शब्दात मांडणंच अवघड आहे. मी लेबर रूममध्ये होतो. मी ती सगळी प्रोसेस बघितली. मी इतका जास्त भावूक झालो होतो. आपण सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये पाहतो, तो त्रास, त्या वेदना आपल्याला बघून माहीत असतात. पण, ते अनुभवणं वेगळं आहे. ते शब्दांत मांडणं खूप कठीण आहे. खूप धावपळ होती, त्या सगळ्यात तिला पाहणं खूप सुंदर क्षण होता”, असं म्हणत राजने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
