एक अभिनेता जेव्हा दुसऱ्या अभिनेत्याचा आदर करतो, त्याच्या कामाचं-मेहनतीचं कौतुक करतो. तेव्हा तो क्षण ‘Fan Moment’ मध्ये बदलतो. ‘सनई चौघडे’ या नव्या मालिकेच्या सेटवर असाच एक खास क्षण जयची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राज हंचनाळेने अनुभवला.
सनई चौघडे मालिकेच्या अलीकडेच प्रसारित झालेल्या भागात प्रेक्षकांना लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकरची झलक पाहायला मिळाली. चिन्मय ‘सनई चौघडे’मध्ये ‘सत्यजित’ची भूमिका साकारणार आहे. त्याच्या एन्ट्रीमुळे मालिकेच्या कथानकात एक नवा ट्विस्ट येणार आहे. सध्या सुरू असलेल्या कथानकानुसार शर्वरी नोकरीसाठी विविध मुलाखती देताना दिसतेय. योगायोगाने ती ज्या कंपनीत इंटरव्ह्यू देते, ती कंपनी सत्यजितची असते. मात्र, त्याचवेळी जय खानोलकरही एका बिझनेस डीलसाठी सत्यजितला भेटायला येतो आणि याच भेटीतून कथानकाला नवं वळण मिळतं. जय पार्टनरशिप करताना शर्वरीला नोकरीवर ठेऊ नकात अशी अट सत्यजितला घालतो. आता शर्वरी कुठे नोकरी मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या ट्रॅकमध्ये राज हंचनाळेला पहिल्यांदाच अभिनेता चिन्मय मांडलेकरसह काम करण्याची संधी मिळाली. त्याने आपला अनुभव शेअर करताना म्हटलं, “चिन्मय सरांसोबत शूट करण्याचा अनुभव माझ्यासाठी खरोखरच खूप समृद्ध करणारा आणि प्रेरणादायी होता. मी त्यांचं काम नेहमीच फॉलो केलेलं आहे. ते माझे आवडते कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. खरं सांगायचं तर, त्यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासोबत एका फ्रेममध्ये उभं राहणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. एका अर्थाने ही माझ्यासाठी ‘Fan Moment’च होती. थोडं प्रेशरही होतं, पण प्रचंड उत्साह सुद्धा होता.”
“मला चिन्मय सरांकडून खूप काही शिकायला मिळालं. सगळ्यात आधी त्यांची कामाची शिस्त! सेटवर आल्यावर ते ज्याप्रकारे स्वतःला कॅरेक्टरमध्ये झोकून देतात, ते पाहून खूप प्रेरणा मिळते. सीन करताना डायलॉग डिलिव्हरीमधली सहजता आणि नॅचरल अभिनय कसा असावा, हे त्यांच्याकडून जवळून अनुभवायला मिळालं. एकंदरीत खूपच छान अनुभव होता.” असं राज हंचनाळेने सांगितलं.
दरम्यान, राज हंचनाळे, चिन्मयी साळवी, मेघना एरंडे, अदिती सारंगधर, सुहास शिरसाट यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेली ‘सनई चौघडे’ मालिका झी मराठीवर सध्या ८:३० च्या प्राइम स्लॉटला प्रसारित केली जात आहे.
