Chinmayi Salvi on Summer Care and Diet Tips: सध्या ‘सनई चौघडे’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या मालिकेतील शर्वरी, असावरी, गौतम, जय खानोलकर, तेजस्विनी खानोलकर, पमा ही आणि इतर सगळीच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

मालिकेबरोबरच हे कलाकार सोशल मिडिया आणि मुलाखती या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता वाढत्या उन्हात हे कलाकार त्यांची कशी काळजी घेतात, याबद्दल अभिनेत्री चिन्मयी साळवीने सांगितले आहेत. चिन्मयीने या मालिकेत शर्वरी ही भूमिका साकारली आहे.

“आमच्या मेघना ताईंनी पहिल्याच दिवशी…”

चिन्मयी साळवीने नुकतीच मराठी सिरिअल्स ऑफिशिअल्सशी संवाद साधला. सेटवरचे वातावरण कले आणि ती स्वतः काय काळजी घेते याबद्दल वक्तव्य केले आहे. ती म्हणाली, “सध्या ‘सनई चौघडे’च्या सेटवर आम्ही उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी खूप जागरूक आहोत, कारण शूट कधी कधी आऊटडोअर असतं, त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे.”

पुढे ती म्हणाली, “सगळ्यात आधी आमचं प्रॉडक्शन खरंच खूप काळजी घेतं. सेटवर कुलर्स, एसी आणि फॅन्सची व्यवस्थित सोय असते, ज्यामुळे वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न असतो. आम्ही स्वतःही नियमितपणे सनस्क्रीन वापरतो आणि हायड्रेशनवर (पाणी पिण्यावर) खूप लक्ष देतो. आम्ही जास्तीत जास्त पाणी पितो. आमचे स्पॉट दादा – ओंकार दादा आणि सतीश दादा – दर तासाला पाण्याची आठवण करून देतात आणि बाटल्या आणून देतात. जेणेकरून आम्ही पाणी प्यायला विसरणार नाही. सेटवर सतत लिंबू सरबत, टॅंग, ऑरेंज ज्यूस अशी रिफ्रेशिंग ड्रिंक्स दिल्या जातात. उन्हाळ्यात चहापेक्षा हीच पेय जास्त आवडतात. एक खूप गोड गोष्ट म्हणजे, आमच्या मेघना ताईंनी पहिल्याच दिवशी आम्हा सगळ्यांना ‘सिपर्स’ भेट दिले होते. त्यामुळे प्रत्येकाकडे स्वतःचा सिपर आहे.”

आहारात काय असतं, याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “आमच्या रोजच्या आहारात दही आणि ताक असतचं, सेटवरच्या जेवणातही ते दिल जात. त्याचबरोबर काकडी, सॅलड, कलिंगड आणि इतर फळं आम्ही घरून सोबत आणतो. अशा थंड आणि हलक्या पदार्थांमुळे शरीर हायड्रेटेड आणि फ्रेश राहायला मदत होते. थोडक्यात सांगायचं तर, या छोट्या-छोट्या सवयींमुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही सेटवर उन्हाळ्याचा सामना अगदी आरामात करत आहोत.”

दरम्यान, सनई चौघडे मालिकेत सध्या असावरीच्या लग्नाची घाई गडबड पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जयचा भाऊ गौतम तिच्या प्रेमात पडला आहे. तिचे लग्न ठरल्याचे समजल्यानंतर त्याने स्वत:ला इजा करून घेतली. तो दारू प्यायला, तसेच त्याने स्वत:ला संपवण्याचाही प्रयत्न केला. आता या सगळ्यामुळे मालिकेत काय ट्विस्ट येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.