Suhas Shirsat on working in Sanai Choughade: सुहास शिरसाट यांनी आजपर्यंत विविध मालिकांमध्ये काम केले आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील त्यांची दत्ता ही भूमिका चांगलीच गाजली होती. ‘छावा’ सिनेमातील त्यांच्या भूमिकेने लक्ष वेधले होते. सध्या ते ‘सनई चौघडे’ या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेतील त्यांची सुभाष परब ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.
“मुलींवर प्रेम करणारा असा सुभाष…”
सुहास शिरसाट यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितले. ते म्हणाले, “दत्ता भाऊपेक्षा सुभाष ही भूमिका वेगळी आहे. म्हणजे दत्ता हा घराची जबाबदारी सांभाळणारा होता, सुभाष परबही घराची जबाबदारी सांभाळणारा आहे. पण, सुभाष खूप प्रेमळ आहे, समजाऊन सांगणारा आहे. दत्ता थोडा चिडचिड करणारा, थोडासा रागीट आहे.”
पुढे ते म्हणाले, “काम करताना मजा येते. चार मुली आहेत. मुलींवर प्रेम करणारा असा सुभाष आहे. मुलीही वडिलांवर प्रेम करतात. या मुलींबरोबर काम करताना तसेच मेघना ताईंबरोबर काम करताना मजा येते. राजू सावंत सर आहेत, २०१६ नंतर पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर काम करायला मजा येतेय.”
वडिलांची भूमिका साकारण्याबद्दल सुहास शिरसाट म्हणाले, “मी माझ्या वडिलांचं निरीक्षण केलं. माझे वडील आणि बहिणीच्या नात्याचं निरीक्षण केलं. मालिकेत वडिलांची भूमिका साकारताना मी त्या गोष्टी लक्षात ठेवतो, त्यामुळे ते पात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. बापाचं आणि मुलींचं प्रेम दाखवलं आहे. आता माझ्या वडिलांचं पात्र मी जगतोय असं मला वाटतंय.”
मालिकेतील मुलींशी कसं नातं आहे, याबद्दलही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, “मी त्यांना रागावतो, कधी प्रेमानंही बोलतो. पण, त्याही ऐकतात. हा कोण आला सांगणारा, असं काही त्यांचं नसतं. बाप म्हणून कर्तव्य असतं, तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याही ऐकतात, ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे.”
ते असेही म्हणाले, “चारही मुली चांगल्या आहेत. आमची मालिका सुरू होऊन सहा-सात महिने झाले, पण अजून रुसवे-फुगवे झाले नाहीत”, असे म्हणत सुहास शिरसाट यांनी ऑनस्क्रीन लेकींचे कौतुक केले.
‘सनई चौघडे’ ही झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी मालिका आहे. या मालिकेत पमा, सुभाष परब यांचे कुटुंब पाहायला मिळते, जे मध्यमवर्गीय आहे. कष्टाने, प्रामाणिकपणे कमावणे यावर त्यांचा विश्वास आहे. याबरोबरच ते त्यांच्या मुलींनाही तेच शिकवतात. त्यांच्या चारही मुली कष्टाळू, प्रेमळ आणि संकटांना धैर्याने सामोऱ्या जाणाऱ्या आहेत.
दरम्यान, मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना दिसतात. सध्या जय व शरू यांच्यातील मैत्री पाहायला मिळत आहे.
