Sanai Choughade upcoming twist: ‘सनई चौघडे’ या मालिकेत असावरी व गौतम यांचे लग्न व्हावे यासाठी जय आणि शर्वरी खूप मेहनत घेत आहेत. असावरी, शर्वरी ऊर्फ शरू म्हणजेच परब हे मध्यमवर्गीय कुटुंब आहे, तर जय व गौतम हे श्रीमंत कुटुंबातील आहेत. तेजस्विनी खानोलकरची ती मुले आहेत. तेजस्विनीला गौतम व आसावरीचे लग्न व्हावे असे वाटत नाही. त्यासाठी तिने जयसमोर एक अट ठेवली होती.
जयला मुली आवडत नाहीत आणि त्याला लग्न करायचे नाही हे माहीत असूनही तिने जय जेव्हा लग्न करेल तेव्हाच गौतम व आसावरीचे लग्न होईल अशी अट ठेवली. त्यानंतर जय, शर्वरी, मॅक यांनी एकत्र येऊन एक योजना बनवली. रावी जयची गर्लफ्रेंड आहे असे सांगण्याचे त्यांनी ठरवले.
जयने जेव्हा रावीची सर्वांसमोर गर्लफ्रेंड म्हणून ओळख करून दिली तेव्हा गौतम व आसावरीचे साखरपुडा पार पडला. या सगळ्यात जय व शर्वरी यांच्यातही चांगली मैत्री झाली आहे. त्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवणे, एकमेकांच्या समस्या जाणून त्यावर उपाय शोधणे, एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे अशा अनेक गोष्टी करणे आवडू लागले आहे.
आता ‘सनई चौघडे’ मालिकेचा एक प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये जय व शरूची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालल्याचे पाहायला मिळत आहे.
“इंटरनेटवर वाचलं आणि जमतंय तसं…”
प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, शरू व जय ऑफिसमध्ये काम करत आहेत. त्यावेळी जय शरूला हॉटबॅग (गरम पाण्याची पिशवी) देतो. ती पिशवी शरू पोटावर ठेवते, त्यानंतर जय तिला गोळ्याही देतो. त्यानंतर ती गोळ्या खाते, पण ती जयला म्हणते, “हे काय जय खानोलकर, मी आजारी नाहीये, मला फक्त पीरियड्स आलेत, मला सवय आहे.”
शरूचे बोलणे ऐकून जय म्हणतो, “मला सवय नाहीये ना, म्हणूनच इंटरनेटवर वाचलं आणि जमतंय तसं करतोय.” पुढे जय तिला चॉकलेट देत म्हणतो, “आता तुझी चिडचिड होणार आणि म्हणूनच हे चॉकलेट. दोस्ती की है निभानी तो पडेगी.” शरू जयकडून चॉकलेट घेते आणि त्याला थोडं चॉकलेट देत म्हणते, “दोस्त की तरफ से…”, त्यानंतर जय व शर्वरी दोघेही चॉकलेट खाताना दिसत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “जय आणि शरूच्या दोस्तीमध्ये एक पाऊल पुढे पडलंय, जमलंय”, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकऱ्यांनी केला कौतुकाच वर्षाव
‘सनई चौघडे’ मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव करत मालिकेचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले, “पीरियड्स हा आतासुद्धा भारतात एक संवेदनशील विषय आहे आणि तरीही तुम्ही तो सुंदर पद्धतीनं मांडला. प्रत्येक स्त्रीला वाटतं की, आपल्याला समजून घ्यावं, काळजी घ्यावी आणि प्रेमानं वागवलं जावं. झी मराठीने ज्या पद्धतीने जय शरूची पिरियड्समध्ये कशी काळजी घेतो हे दाखवलंय ते खूप आवडलं. पाऊल पुढे पडलंय, जमलंय.” दुसऱ्या एकाने लिहिले, “मिस्टर जय खानोलकर ग्रीन फॉरेस्ट आहे”, आणखी एकाने लिहिले, “ही गोष्ट खूप सकारात्मक आहे”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी झी मराठी, मालिकेतील कलाकार आणि लेखकांचे कौतुक केले आहे.



दरम्यान, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
