Zee Marathi Serial : ‘झी मराठी’वरील ‘सनई चौघडे’ मालिकेत आता कथानकाला एक नवीन वळण मिळणार आहे. गैरसमज, नात्यांतील तणाव आणि त्यातून होणारी जाणीव यामुळे मालिकेत मोठे बदल घडताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. जेलमधून सुटल्यानंतर शरू जयसाठी स्वागताची तयारी करतेय. मात्र, आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटनांसाठी जय महिलांनाच जबाबदार धरतो. रागाच्या भरात तो आपल्या कार्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतो. जयच्या या निर्णयामुळे शरू खूप दुखावली जाते.
गौतम जयसमोर सर्व सत्याचा उलगडा करतो. जयला वाचवण्यासाठी शरूने स्वतःच्या सन्मानाचीही पर्वा केलेली नाहीये. शरूच्या संघर्षाची जाणीव होताच जयला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होणार आहे.
यानंतर जय माफी मागून, सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू करून घेणार आहे. दुसरीकडे, परब कुटुंबात आसावरीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. गौतम जबाबदार व्हावा आणि स्वतःच्या पायावर उभा राहावा अशी सुभाषची इच्छा आहे. त्यासाठी तो गौतमची परीक्षा घेण्याचं ठरवतो.
दरम्यान, प्रॉडक्ट सर्व्हेदरम्यान शरू जयला सामान्य लोकांशी कसं कनेक्ट व्हायचं हे शिकवते. त्याचा दृष्टीकोन बदलण्यास ती मदत करते. याच वेळी एक वयोवृद्ध जोडपं त्यांना नवरा-बायको समजतात. त्या जोडप्याच्या बोलण्यामुळे जयला शरूमुळे आपल्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल जाणवतो.
यानिमित्ताने मालिकेत लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांची एन्ट्री होणार आहे. आजवर त्यांनी झी मराठीच्या ‘शुभं करोती’, ‘वादळवाट’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. विशेषत: वादळवाट मालिकेत त्यांनी साकारलेल्या आबांच्या भूमिकेने सर्वांची मनं जिंकून घेतली होती.
आता शरू आणि जयच्या नात्याला नवी दिशा मिळणार का? जयचा हा बदल कायम राहणार का? गौतम स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकेल? या सर्व उत्तरांसाठी पाहायला विसरू नका ‘सनई चौघडे’. ही मालिका दररोज रात्री ८:३० वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते.
