Sanchita Ugale : अभिनेत्री संचिता उगलेच्या निधनाच्या बातमीने मनोरंजनविश्वातील सगळ्यांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्रीने १४ जून रोजी गळफास घेत आयुष्य संपवलं. तिच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून इंडस्ट्रीतील तिचे सहकलाकारही याबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत. अशातच आता तिची सहअभिनेत्री मेघा शर्माने संचिता नैराश्यात होती आणि अनेकदा टोकाचं पाऊल उचलणार असं म्हणायची असा दावा केला आहे.
‘मनी कंट्रोल’सह संवाद साधताना अभिनेत्री मेघा शर्मा संचिताबद्दल म्हणाली, “तिने गळफास घेत आत्महत्या केली हे समजल्यानंतर मला धक्का बसला आहे. माझ्याकडे आता शब्द नाहीयेत.” तिने पुढे सांगितलं की संचिता आरोग्याच्या समस्यांचा सामना करत होती आणि जानेवारीपासून तनावपूर्ण परिस्थितीतून जात होती. तसेच काही वैयक्तिक कारणांमुळे त्रस्त होती आणि त्यासाठी उपचारही घेत होती.”
निधनाच्या १० दिवसांपूर्वी संचिताशी झालेली भेट
संचिताबरोबरच्या शेवटच्या भेटीची आठवण सांगत मेघाने सांगतिलं की दहा दिवसांपूर्वी ती संचिताला भेटली होती आणि तिच्याबरोबर ऑडिशनसाठी गेली होती. अभिनेत्री म्हणाली, “ती खूप आनंदी राहणारी मुलगी होती. दहा दिवसांपूर्वीच आमची भेट झालेली आणि मी तिला ऑडिशनसाठी घेऊन गेले होते. तिला पूर्ण विश्वास होता की तिला ही संधी मिळेल. मात्र, त्यानंतर तिचा फोन बंद येऊ लागला.”
मेघाने पुढे संचिताने तिला पूर्वी आयुष्य संपवण्याबद्दलच्या विचाराबद्दल सांगितल्याचा धक्कादायक दावा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, “ती अनेकदा तिचं आयुष्य संपवण्याबद्दल बोलायची. मी, तिची आई आणि कुटुंबातील इतर सदस्य तिला नेहमी सकारात्मक राहण्याचा सल्ला द्यायचो आणि अशा नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहन द्यायचो.” पुढे तिने संचिताला आपण यामधून बाहेर काढू शकलो नाही असं म्हणत खंत व्यक्त केली आहे.
दरम्यान, संचिता उगले हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा होती. तिने ‘कुमकुम भाग्य’, ‘अंजान घर’, आणि ‘दिलवाली दुल्हा ले जायेगी’ यांसारख्या कलाकृतींमध्ये काम केलं आहे. ती विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटातही झळकलेली. १४ जून रोजी अभिनेत्रीने तिच्या नालासोपारातील राहत्या घरी टोकाचं पाऊल उचललं. माध्यमांच्या वृत्तानुसार तिने आत्महत्या केली असून पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. अवघ्या लहान वयात झालेल्या तिच्या निधनाने तिच्या कुटुंबीयांवर आणि जवळच्या व्यक्तींवर दु:खाचा डोंगर कोसळा आहे.
