Sanchita Ugale Grandfather Reaction: ‘कुमकुम भाग्य’ आणि विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या २२ वर्षीय मराठी अभिनेत्री संचिता उगले हिच्या आत्महत्येने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील घरात रविवारी १४ जून रोजी संचिताचा मृतदेह आढळला. या धक्कादायक घटनेनंतर संचिताचे आजोबा गोपीनाथ यांनी माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला आहे. “इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसताना तिने स्वतःच्या बळावर नाव कमावले होते. तिच्याकडे काम होते, त्यामुळे काम न मिळाल्याने तिने हे पाऊल उचलल्याच्या अफवा खोट्या आहेत,” असे सांगत आजोबांना अश्रू अनावर झाले. ‘साजन घर’ मालिकेतील ‘पूजा’ या भूमिकेने ती घराघरात प्रसिद्ध होती.
संचिताचे आजोबा गोपीनाथ यांनी सांगितलं की, कोणताही गॉडफादर नसताना तिने स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं होतं. संचिताच्या आठवणीत त्यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, “संचिता प्रचंड गुणी मुलगी होती. तिने स्वतःच्या कर्तृत्वावर आणि कठोर मेहनतीने प्रगती केली होती. चित्रपट किंवा मालिका विश्वात तिचा कोणीही गॉडफादर नव्हता.”
“तिच्या मनात नेमकं काय चाललं होतं, तिला काय प्रॉब्लेम होता हे कोणालाच माहीत नाही. कारण तिचे कोणाशीही भांडण, वाद नव्हते. कोणी तिच्याबद्दल कधीच वाईट बोललं नाही. तिला कशाचीच कमतरता नव्हती. तिने सगळं मेहनतीने कमावलं. ती एक अत्यंत कर्तबगार मुलगी होती. तिने आमच्या संपूर्ण तालुक्यात आणि अहिल्यानगर जिल्ह्यात स्वतःचं मोठं नाव कमावलं होतं,” असं तिचे आजोबा म्हणाले.
चाहते तिला संचिता ऐवजी ‘पूजा’ म्हणायचे
‘साजन घर’ या मालिकेत तिने साकारलेल्या ‘पूजा’ या भूमिकेमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर लोक तिला तिच्या खऱ्या नावाऐवजी तिच्या पात्राच्या नावानेच ओळखू लागले. “जे लोक तिच्या मालिका पाहायचे, ते तिला ‘पूजा’ म्हणूनच ओळखायचे. त्या भूमिकेमुळे ती इतकी लोकप्रिय झाली होती की आमच्या जिल्ह्यातील लोक तिला पूजा म्हणूनच हाक मारायचे,” असंही तिचे आजोबा म्हणाले.
त्यांनी संचिताच्या आठवणींना उजाळा दिला. “मी कधी कुठे बाहेर गेलो आणि ती माझी नात आहे असं सांगितल्यावर लोकांना कौतुक वाटायचं. सर्वजण तिला पूजा म्हणायचे. संचिता म्हणून तिला तिथे फारसं कोणी ओळखत नव्हतं. मालिकेतील तिच्या ‘पूजा’ या नावानेच ती घराघरात पोहोचली होती,” असं तिच्या आजोबांनी सांगितलं.
“हे सगळं खूप त्रासदायक आहे. तिने असं का केलं… तिच्या मनात काय चाललं होतं हे फक्त देवालाच माहित. हे आमच्या समजण्याच्या पलीकडचं आहे,” असे ते म्हणाले. संचिताने ‘काम न मिळाल्यामुळे तिने आत्महत्या केली’ या अफवा फेटाळत तिच्याकडे काम होतं, असंही त्यांनी सांगितलं.
‘AICWA’ कडून प्रकरणाच्या चौकशीची मागणी
दरम्यान, ‘ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन’ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संचिताच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, तिच्या वडिलांनी या मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचं म्हटलं आहे.
