‘छावा’ व ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री संचिता उगले हिने आत्महत्या केली. घरी कोणीच नसताना तिने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. रविवारी, १४ जून २०२६ रोजी संचिताने हे धक्कादायक पाऊल उचललं. संचितावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी तिच्या पार्थिवाजवळ आईने एकच आक्रोश केला. संचिताला उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईचा व्हिडीओ पाहून सर्वांचे डोळे पाणावले आहेत.
संचिता उगले अवघ्या २२ वर्षांची होती. तिने आतापर्यंत काही चित्रपट व हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. १४ जून रोजी आत्महत्या करण्याच्या काही तासापूर्वी तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात ती खूप आनंदी दिसत होती. आई-वडील व धाकटी बहीण घरात नसताना संचिताने टोकाचं पाऊल उचललं. कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
संचिताचं पार्थिव घरी आणल्यावर तिला पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. तिच्या आईची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. ‘ए बबड्या उठ ना.. ए संचू उठ ना…तू मला आई म्हण ना.. ए संचू.. ए बबड्या.. तू का असं केलंस..,’ असं तिची आई या व्हिडीओत म्हणताना दिसते. तिच्या आईचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून नेटकरीही भावुक झाले आहेत.
संचिता उगलेच्या आईचा व्हिडीओ
दरम्यान, संचिताचे वडील मच्छिंद्र उगले यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांना लेकीच्या आत्महत्येबद्दल कुणावरही संशय नाही. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
भावाने जोडले सुशांत सिंहच्या आत्महत्येशी कनेक्शन
संचिताच्या चुलत भावाने मात्र बहिणीच्या आत्महत्येचं कनेक्शन सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी जोडलं आहे. सुशांतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. संचिताने देखील १४ जूनलाच आत्महत्या केली होती. संचिताच्या भावाने तिचं एक इन्स्टाग्राम अकाउंटही दाखवलं, ज्यावर सुशांत संबंधित पोस्ट दिसत आहेत. त्यादिवशीही त्या अकाउंटवरून सुशांतच्या पुण्यतिथीची पोस्ट करण्यात आली होती. त्याच संध्याकाळी संचिताने आत्महत्या करून जीवन संवलं.
संचिता उगलेच्या निधनाने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर इंडस्ट्रीवरही शोककळा पसरली आहे. सोरब बेदीसह अनेक कलाकारांनी संचिताच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
