Roomani Khare & Stavan Shinde Wedding : प्रसिद्ध मराठी गीतकार, कवी संदीप खरे यांच्या घरी गेले काही दिवस लग्नाची धामधूम सुरू आहे. संदीप खरे यांची लेक रूमानी खरेच्या लग्नाची गेले काही दिवस सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती. अशातच आता रूमानी लग्नबंधनात अकडली आहे.

गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधत एका नव्या आयुष्याला सुरुवात केली. अभिनेत्री रेवती लेले, विशाल निकम-अक्षया हिंदळकर, अपूर्वा नेमळेकर यांनी लग्न केलं. यात आता रूमानीसुद्धा लग्नबंधनात अडकली आहे.

रूमानी खरे आणि स्तवन शिंदे अडकले लग्नबंधनात

संदीप खरे यांची लेक रूमानी खरेने स्तवन शिंदेबरोबर लग्नगाठ बांधली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये साखरपुड्याचे खास फोटो शेअर करीत दोघांनी त्यांच्या नात्याबद्दलची गुडन्यूज शेअर केली होती. अशातच आज रूमानी-स्तवन यांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

स्तवननं लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रूमानीनं हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे आणि केसांत सुंदर असा गजरा परिधान केला आहे. तिचा हा नव्या नवरीचा लुक खूपच लक्षवेधी आहे. तर स्तवनने लग्नात पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली असून डोक्यावर फेटा घातल्याचं या फोटोतून पाहायला मिळत आहे.

स्तवन-रूमानी यांनी लग्न लागताच एकमेकांना नमस्कारदेखील केला. त्यांची ही कृती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच कमेंट्समधूनही कलाकार आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावसुद्धा केला आहे. नुकताच या दोघांचा संगीत समारंभ सोहळा पार पडला. यावेळी संदीप खरे यांनी लेकीबरोबर भन्नाट डान्ससुद्धा केला.

रूमानी खरे आणि स्तवन शिंदेच्या लग्नाचे फोटो

‘राणी माझ्या मळ्यामंदी’ या लोकप्रिय गाण्यावर बाप-लेकीनं ठेका धरला होता. रूमानी आणि संदीप खरे यांच्याबरोबर स्तवनलादेखील त्यांच्याबरोबर नाचण्याचा मोह आवरता आला नाही.

दरम्यान, रूमानी-स्तवन यांच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ‘तू तेव्हा तशी’ या लोकप्रिय मालिकेद्वारे रुमानीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यानंतर ती ‘आत्मपॅम्फ्लेट’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सध्या ती ‘लागली पैज’ हे नाटक करीत आहे. तर स्तवनसुद्धा मराठी कलाविश्वातला लोकप्रिय अभिनेता आहे. स्टार प्रवाहच्या ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मालिकेत झळकला होता. ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतही त्यानं काम केलं होतं.