सिनेविश्वातील प्रसिद्ध कवी व गीतकार संदीप खरे यांच्या लेकीने नुकतीच चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. रुमानीने ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आता संदीप खरेंची लाडकी कन्या लवकरच बोहल्यावर चढणार आहे. आज ( १३ डिसेंबर ) रुमानीचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. अभिनेत्रीच्या साखरपुड्याच्या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. रुमानीचा होणारा पती आणि संदीप खरे यांचा जावई कोण आहे पाहुयात…
संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे हिने ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ‘झी मराठी’च्या या लोकप्रिय मालिकेत रुमानीने राधा भूमिका खूप उत्कृष्टरित्या साकारली होती. तिला या भूमिकेसाठी पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. यानंतर रुमानी ‘दुर्गा’ मालिकेत झळकली. आता अभिनेत्रीने आयुष्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. रुमानीने लोकप्रिय अभिनेता स्तवन शिंदेसह साखरपुडा केला आहे.
स्तवन शिंदे याने या दोघांच्या साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. मराठी कलाकारांनी रुमानी आणि स्तवन यांच्या सुंदर फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पहिल्या फोटोत स्तवन रुमानीला गुडघ्यावर बसून अंगठी घालत असल्याचं पाहायला मिळत आहे.
स्तवन शिंदेबद्दल सांगायचं झालं तर, आजवर त्याने अनेक मराठी हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मालिकेत तो झळकला होता. याशिवाय स्तवनने ‘पार्टी’, ‘क्लास ऑफ 83’ या सिनेमांमध्ये काम केलेलं आहे.
स्तवन व रुमानीबद्दल सांगायचं झालं, तर दोघांनीही साखरपुड्यात पारंपरिक लूक केला होता. गुलाबी रंगाच्या साडीत रुमानी खूपच सुंदर दिसत होती. या दोघांच्या फोटोवर यशोमन आपटे, ऋजुता देशमुख, सिद्धार्थ चांदेकर, अभिषेक रहाळकर, प्रार्थना बेहेरे, अंबर गणपुळे, मिताली मयेकर, अश्विनी महांगडे, पूर्वा कौशिक यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
