Sanika Banaraswale on Paryushan Parva and Pooja Birari Mangalagaur: ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम सानिका बनारसवाले ही अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती व्हिडीओंमधून तिच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करते.
सानिका बनारसवाले करतेय एकासना उपवास
सानिकाने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सानिकाने पूजा बिरारीच्या मंगळागौरीला गेल्याचा खुलासा केला. तसेच, पर्युषण पर्व आणि एकासना उपवास याबद्दलही सांगितले. ती नेमकं काय म्हणाली हे जाणून घेऊ…
सानिका व्हिडीओमध्ये सुरुवातीला म्हणाली, “आज किती काळानंतर अशी फुगडी खेळले आहे. पूजाची मंगळागौर हे कारण होतं. मी काही न खाता-पिता हे खेळ खेळले. आदल्या दिवशी पावणे बारा वाजता मी शेवटचं पाणी प्यायलं होतं. या मंगळवारपासून पर्युषण पर्व सुरू झालं आहे आणि मी एकासना उपवास करत आहे, ज्यात एकाच वेळी पाणी, चहा, जेवण घ्यायचं आहे. मात्र, सूर्यास्तानंतर पाणी आणि जेवण घ्यायचं नाही. आता हे मी सलग आठ दिवस करणार आहे. पहिल्या दिवशी माझं वजन ५७ किलो आहे. आता आठव्या दिवशी किती वजन असणार हे शेवटच्या व्हिडीओमध्ये समजणार आहे.”
पुढे ती म्हणाली, “या उपवासात बाहेरचं खायचं नाही, जमिनीखालचं खायचं नाही, ओलं खायचं नाही; फक्त वाळवलेलं खाऊ शकतो. आजच्या जेवणासाठी मी सोया चंक, चकोल्या आणि भात केला होता. जेवायला बसतानाच मला ब्रश करायचा आहे. तोपर्यंत तोंडात पाणीही नाही घ्यायचं. खायचं सगळं एकाच वेळी टेबलवर घेऊन बसायचं आणि बसलं की उठायचं नाही. सुरुवातीला ३ नवकार मंत्र म्हणून पाणी ग्रहण करायचं आणि मग पूर्ण जेवण; एकाचवेळी जास्त खायचं म्हणून जेवायला १ तास तरी लागतो. कारण आता मी थेट उद्या जेवणार. आजचा एकासना पूर्ण करून, छान तयार होऊन मी पूजाच्या मंगळागौरसाठी गेले. जवळपास ६२ मंगळागौरीचै खेळ खेळलो”, असे म्हणत सानिकाने एकासना उपवास आणि पूजाच्या मंगळागौरबद्दल सांगितले.
हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, “पूजाची मंगळागौर आणि पर्युषण पर्व; दोन संस्कृती, एकच आनंद.” सानिकाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “वाह! जैन आणि एवढी चांगली मराठी”, त्यावर सानिकाने लिहिले, “माहेरची मराठी आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले, “५७ किलो तर वजन आहे, अजून किती वजन कमी करणार”, त्यावरही सानिकाने रिप्लाय केला आणि लिहिले, “बघ की नुसतं फॅड”, एकाने लिहिले, “तू मंगळागौरीचे खेळ खूप छान खेळलीस”, त्यावर सानिकाने लिहिले, “हो, खूप मजा आली.”
पर्युषण पर्व हे जैन धर्मातील आत्मशुद्धी, तपश्चर्या आणि क्षमायचनेचे सर्वात मोठे व पवित्र महापर्व मानले जाते. यावर्षी मंगळवारपासून पर्युषण पर्वाला सुरुवात झाली असून ८ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत पर्युषण पर्व साजरे केले जाणार आहे.
दरम्यान, सानिका, पूजा यांनी मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी सुंदर साड्या नेसल्याचे दिसत आहे. तसेच, त्या मंगळागौरीचे विविध खेळ खेळताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये सोहमचीदेखील झलक पाहायला मिळाली.
