Mi Jinkun Ghein Saara new entry: ‘मी जिंकून घेईन सारं’ ही कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील राजगुरू कुटुंबाच्या घरात सतत काही ना काही घडताना दिसते. छवी व शांभवी यांच्यात शाब्दिक वाद होतात. शांभवी राजगुरू कुटुंबात सून म्हणून आली आहे; पण तिला राजगुरूंना उद्ध्वस्त करायचे आहे. मात्र, छवी तिची कट-कारस्थाने परतवून लावत आहे. त्यामुळे त्यांच्यात सतत काही ना काही घडताना दिसते.
‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री
या सगळ्यात छवी व अनिकेतचे एका वेगळ्या परिस्थितीत लग्न झाले. अनिकेतसाठी छवी फक्त त्याची चांगली मैत्रीण आहे; तर छवीचे अनिकेतवर प्रेम आहे. मात्र, तिने तिचे प्रेम आजपर्यंत त्याच्यासमोर व्यक्त केले नाही. आता अनिकेतची मैत्रीण जेसिका छवी व अनिकेतच्या आयुष्यात आली आहे. मंगळागौरीच्या कार्यक्रमादरम्यान जेसिकाची एन्ट्री झाली आहे. ती ज्यावेळी राजगुरूंच्या वाड्यात आली, त्यावेळी छवी अनिकेत आणि सगळ्यांसमोर तिच्या मनातील भावना व्यक्त करीत होती. मात्र, त्याच वेळी जेसिका आली आणि तिला पाहून अनिकेतला आनंद झाला, तो तिच्याकडे गेला. त्यामुळे छवीचे बोलणे पूर्ण होऊ शकले नाही.
जेसिकाची भूमिका अभिनेत्री सानिका काशिकरने साकारली आहे. त्यामुळे सानिका काशिकर आता एका नवीन आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा हा लूक अत्यंत वेगळा आहे. ती मॉडर्न अवतारात दिसत आहे. सानिकाचा ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेतील हा लूक तिच्या आधीच्या मालिकांतील लूकपेक्षा अत्यंत वेगळा दिसत आहे.
सानिकाला याआधी ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत तिने लक्ष्मी ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती शुभ श्रावणी या मालिकेतही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्याबरोबरच काव्यांजली या मालिकेतही ती दिसली होती. कढीपत्ता आणि होय महाराजा या सिनेमांतही सानिकाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. सानिका शॉर्ट फिल्ममधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते. आता सानिकाला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दरम्यान, आता जेसिकाच्या येण्याने अनिकेत व छवीच्या नात्यात दुरावा येणार का, छवीविरुद्ध लढण्यासाठी शांभवी व जेसिका एकत्र येणार का, मालिकेत काय ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
