Sanjay Mone on Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’ हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. या शोमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांतून स्पर्धक सहभागी होण्यासाठी येतात. त्यांना विविध क्षेत्रातील, विषयांवरील प्रश्न विचारले जातात. यंदाच्या कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित करत आहे. पण, याआधी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांनी या शोचे सूत्रसंचालन केले आहे. सुरूवातीला सचिन खेडेकर यांनी शोचे सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर स्वप्नील जोशी व नागराज मंजुळे यांनीही शोचे सूत्रसंचालन केले आहे.
“कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी”
आता माधुरीच्या सूत्रसंचालनाबाबत ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी एक टिप्पणी केली आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “का कुणास ठाऊक? पण, आज दीक्षित बाईंचा कार्यक्रम बघितला आणि एक जुनी मराठी म्हण आठवली. ती म्हण अशी, “कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी.”
पुढे त्यांनी लिहिले, “त्यापेक्षा सचिन खेडेकर तोच कार्यक्रम अप्रतिम सादर करायचे.” संजय मोने यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. नेटकरी नेमकं काय म्हणालेत, हे जाणून घेऊ…

एका नेटकऱ्याने लिहिले, “हा उल्लेख जातीय वाटत नाही? बघा हो हल्ली कोणाचा पापड कसा मोडेल हे सांगता येत नाही”, दुसऱ्या एकाने लिहिले, “पण सचिनजी भुमिका नाटकात बिझी आहेत”, आणखी एकाने लिहिले, “का करावा अट्टाहास.करावा आराम. सगळंच कसं जमेल बरं? द्यावा काही ठिकाणी विराम. आठवले म्हणून पाठवले.”
एकाने लिहिले, “हिंदीत नाव केलेली, कोणी मराठी अभिनेत्री घ्यायचीच होती. तर अगदी उर्मिला मातोंडकर जास्त योग्य होती. मराठी माध्यमातील शिक्षणामुळे, तिच्याकडे भाषेची जाण आहे. महत्वाचं म्हणजे अशा ठिकाणी लागणारी उत्स्फूर्तता, नक्कीच अधिक आहे. फक्त उकडीचे मोदक नि वरण भात आवडतो, हा काही मराठीतील कार्यक्रम निभावून नेऊ शकण्याचा निकष ठरू शकत नाही.”
एकाने लिहिले, “मी हा शो फक्त हिंदीच पाहिलाय आणि बच्चन सरांनी अतिशय वरच्या लेव्हलचा बेंचमार्क सेट करुन दिलेला आहे. मराठी वाचन चांगलं असणारी, भाषा चांगली बोलणारी उर्मिला मातोंडकर अधिक छान वाटली असती असं मला वाटतं”, एकाने लिहिले, “हो, उर्मिला मातोंडकर योग्य वाटली असती. माधुरी दीक्षितला आठवून आठवून मराठी बोलावी लागते. सोनाली बेंद्रेचंही तसंच आहे.” एकाने लिहिले, “रेणुका शहाणे ह्यांची निवडही योग्य ठरली असती”, तर आणखी एकाने लिहिले, “पल्लवी जोशी बेस्ट”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी संजय मोनेंच्या पोस्टवर सहमती दर्शवली आहे.

तर, अनेकांनी माधुरीची बाजू घेत संजय मोनेंच्या मताशी असहमती दर्शवली. एकाने लिहिले, ” कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी” हीच म्हण तुमचा “ती फुलराणी’ मधला प्रा अशोक जहागीरदार बघतांना आठवली होती”, आणखी एकाने लिहिले, “मत व्यक्त करण्यासाठी घाई झाली असं नाही वाटत?” एकाने लिहिले, “मराठी माणूस नाव ठेवण्यात पुढे”, आणखी एकाने लिहिले, “पहिले काही एपिसोड पाहून मलाही तसेच वाटले होते. अजिबात आवडली नाही. पण, आता तिच्यामध्ये सुधारणा वाटत आहे. आता तिच्यामध्ये आधीपेक्षा आत्मविश्वास दिसत आहे.”



दरम्यान, कोण होणार करोडपतीच्या या पर्वात आतापर्यंत अनेक कलाकार आले आहेत. यामध्ये आदिनाथ कोठारे, यामी गौतम, रेणुका शहाणे, प्रिया बेर्डे अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे.
