संकर्षण कऱ्हाडे व अधोक्षज कऱ्हाडे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी भावंडांपैकी एक आहेत. दोघेही या क्षेत्रात सक्रीय असून दोघांच्या कामाचं त्यांच्या चाहत्यांकडून कौतुक होत असतं. संकर्षणने तर त्याच्या कामामुळे प्रेक्षकांच्या मनात घरच केलं आहे, पण फक्त कामच नव्हते तर या दोघांचा स्वभाव, त्यांचे संस्कार याबद्दलही त्यांचे चाहते अनेकदा बोलत असतात. आजच्या काळात जिथे अनेक जण कुटुंबापासून वेगळं राहत आहेत तिथे हे दोघे भाऊ एकत्र कुटुंबात राहत आहेत. अशातच आता अधोक्षजने याबद्दल सविस्तर सांगितलं आहे.

अधोक्षजने एकत्र कुटुंबाबद्दल बोलत असताना त्याचे फायदे काय असतात, कुटुंबाबरोबर राहत असताना सर्व गोष्टींचं नियोजन कशाप्रकारे केलं जातं आणि त्याचे त्याच्या कुटुंबाबरोबरचे संबंध कसे आहेत याबद्दल सविस्तर सांगितलं आहे. अधोक्षजने यावेळी मनोरंजन क्षेत्रासारख्या स्थिरता नसलेल्या क्षेत्रात काम करत असताना एकत्र कुटुंबाचा त्याला फायदा होतो असंही सांगितलं आहे.

अधोक्षजची एकत्र कुटुंबाबद्दल प्रतिक्रिया

नवराष्ट्रला दिलेल्या मुलाखतीत अधोक्षजला या क्षेत्रातील अस्थिरतेबद्दल विचारल्यानंतर म्हणाला, “मला आठवतंय एका कंपनीमध्ये मी मुलाखतीसाठी गेलो होतो. त्यापूर्वी मी नोकरी केली होती. त्या कंपनीत गेल्यानंतर मी वातावरन पाहिलं आणि तिथून पळून आलो आणि ठरवलं की नाही ९ ते ५ काम नाही करायंचय, मी सेटवर १२ तास काम करेन. मला तेच आवडतं, पण हे क्षेत्र अस्थिर असलं तरी अजून अशा आर्थिक चर्चा आमच्यामध्ये फार होत नाही कारण आम्ही स्थिर आहोत त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आम्ही एकत्र राहतो.”

एकत्र कुटुंबाबद्दल अधोक्षज पुढे म्हणाला, “आजच्या काळात एकत्र कुटुंबात राहण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे एकत्र कुटुंबात राहताना खर्च वाटून घेतला जातो. आजही आम्ही आई-बाबांबरोबर राहतो. घरातील जो काही खर्च असतो तो बाबा बघतात, इएमआय वगैरे संकर्षण पाहतो आणि टीव्हीचा रिचार्ज असो, लाईट बील असो, दुध वाल्याचे पैसे असे खर्च मी बघतो. या गोष्टी ठरवून होत नाही त्या समजुतदारपणाने करण्याची गोष्ट आहे.

अधोक्षज पुढे म्हणाला, या क्षेत्रात काम करत असताना मला एका महिन्याला एक लाख रूपये मिळतात तर कधी कधी पाच-दहा हजारही मिळत नाही. कारण दोन तीन महिने कामच नसतं. अशावेळी माझी बायको मला मदत करते. ती आर्किटेक्ट आहे. तिला महिन्याला ठरलेली रक्कम मिळते. ही कल्पना आम्ही लग्नाआधीच देऊन ठेवलेली. की हे क्षेत्र अस्थिर आहे त्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे कधी कधी माझी बायको खर्च उचलते कधी कधी मी करतो.