आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारा मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकर यांचं अपहरण झाल्याची बातमी समोर आली होती. हे अपहरण दुसरं तिसरं कोणी नाही तर ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या बालकलाकारांनी मिळून केलं होतं.

झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘ड्रामा ज्युनिअर्स’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये संकर्षण परीक्षक म्हणून दिसणार आहे. जिथे तो चिमुकल्या स्पर्धकांना मार्गदर्शन करताना दिसेल.

हेही वाचा… वडिलांनी कायमचं मारून टाकण्याच्या आधीच आईने दिला पळून जाण्याचा सल्ला, ‘या’ अभिनेत्याने सांगितला आयुष्यातला तो कठीण प्रसंग

वैयक्तिक आयुष्यात संकर्षण दोन चिमुकल्यांचा बाबा आहे. आता तो ‘ड्रामा ज्युनिअर्स’ची ड्रामा बच्चे कंपनी सांभाळणार आहे. यानिमित्ताने, संकर्षणने फादर्स-डे दिवशी बाबा होण्याचा अनुभव सांगितला. तसंच संकर्षण त्याच्या बाबांकडून काय शिकला आणि त्यांचे कोणते गुण त्याने घेतले हेदेखील त्याने सांगितलं. संकर्षण म्हणाला, “मी दोन जुळ्या मुलांचा बाबा आहे. २७ जूनला त्यांना ३ वर्ष पूर्ण होतील. बाबा म्हणून संयम काय असतो हे मी शिकलो आहे. माझी नवीन मालिका ‘ड्रामा ज्युनिअर्स’ मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत या संयमाचा खूप उपयोग होणार आहे. आधी मी जितका अधीर होतो तितका राहिलो नाही. कारण लहान मुलांना सांभाळणं, त्यांना वाढवणं अतिशय संयमाचं काम आहे, ते कुठल्या क्षणी काय मागतील, कसे वागतील, कसे पाहतील आणि काय करतील याचा काहीच नेम नसतो. अशावेळी तुम्ही थकलेले असाल, तुम्ही काम करून घरी आलेले असाल, वेगळ्या विचारात असाल तरी त्याच्यावर तुम्हाला रागवून रिऍक्ट करण्याची परवानगीदेखील नाही.

संकर्षण पुढे म्हणाला की, “मुलांना कळत नाही की ते आता काय करतायत त्याच्यामुळे त्यांना सांभाळणं आणि हसतं ठेवणं भयंकर संयमाचं काम आहे. एक बाबा म्हणून माझा संयम प्रचंड वाढला आहे. मी माझा राग राखून ठेवतो आणि जीव लावून प्रेम करतो. मला माझी लहान बाळं एक क्षण ही रडलेली आवडत नाहीत. मी माझ्या बायकोला शलाकाला तेच सांगत असतो, की ते रडत असताना त्यांना काय पाहिजे ते दे आणि जेव्हा त्यांचं रडणं थांबतं तेव्हा त्यांना मी जवळ घेऊन समजावतो आणि त्यांना ते कळतं.

हेही वाचा… ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम शिवानी नाईक आणि साईराज केंद्रेला पडली ‘पुष्पा-२’ च्या गाण्याची भुरळ, व्हिडीओ व्हायरल

संकर्षण असंही म्हणाला की, “माझ्या बाबांबद्दल बोलायचं झालं तर ते अत्यंत प्रामाणिक, दिलंय ते काम नियमाने, नित्याने सचोटीने करणारे माणूस आहेत. हा बाबांचा गुण मला खूप आवडतो. त्यांच्यातली भावनिकता मला खूप आवडते, तसंच त्यांचा खरेपणाही मला भावतो. त्यांचा मुलगा म्हणून मी कायम माझ्या वागण्यात तो प्रामाणिकपण आणि ती भावनिकता आणण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण कुटुंबाला उत्तम आयुष्य कसं द्यायचं हे बाबांनी काटाक्षने पाळलं आणि एक छान आयुष्य त्यांनी आम्हा सर्वांना दिलं. त्याचंच मी तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत आहे.”

दरम्यान, संकर्षण कऱ्हाडे ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या शोमध्ये पहिल्यांदाच परीक्षक म्हणून दिसणार आहे. २२ जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता झी मराठीवर “ड्रामा ज्युनिअर्स” प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.