Sankarshan Karhade Post : संकर्षण कऱ्हाडे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तो नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. संकर्षण सोशल मीडियावरही सक्रिय असतो आणि त्यामार्फत त्याच्या दैनंदिन जीवनातील अपडेट तो त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो.

संकर्षण अनेकदा नाटक, मालिका या त्याच्या कामांसंदर्भातील माहितीसुद्धा सोशल मीडियावर नियमित पोस्ट करून देत असतो. काही वेळेला अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यातील गमतीशीर गोष्टीदेखील चाहत्यांबरोबर शेअर करतो. अशातच आता त्यानं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याच्याबरोबर पोलीस अधिकारी पाहायला मिळत आहेत. संकर्षणनं या पोस्टमधून पोलिसांनी त्याची गाडी थांबवल्यानंतर काहीही केलेलं नसताना त्याला भीती वाटत होती, असं म्हटलं आहे. संकर्षण नेमकं काय म्हणाला याबद्दल जाणून घेऊयात.

संकर्षण काय म्हणाला?

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोला संकर्षणनं गमतीशीर अशी कॅप्शन दिली आहे. पोलीस अधिकारी यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर करत अभिनेता म्हणाला, “रात्री अचानक आपली गाडी थांबवली जाते, काहीही केलेलं नसताना भीती वाटते आणि मग पोलीसमामा येऊन म्हणतात की, साहेब एक फोटो काढू आणि मग खूप गप्पा” या कॅप्शनमधून संकर्षणनं पुढे म्हटलं, “खरं सांगू तर वर्दीतल्या सेलिब्रिटींबरोबर फोटो काढायला मला फार आवडतं”.

संकर्षण कऱ्हाडेनं आतापर्यंत अनेक नाटक, मालिकांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे त्याची मराठी प्रेक्षकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आहे. परंतु, फक्त त्याचे चाहतेच नव्हे, तर कलाकार आणि इतर क्षेत्रातील लोकप्रिय मंडळीसुद्धा त्याच्या कामाचं अनेकदा कौतुक करत असतात. अभिनव्यतिरिक्त संकर्षण एक उत्तम कवी आणि लेखकसुद्धा आहे. अनेकदा त्याच्या कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे संकर्षण हा मराठी इंडस्ट्रीतील अष्टपैलू कलाकारांपैकी एक मानला जातो.

दरम्यान, सध्या संकर्षण त्याच्या ‘कुटुंब किर्रतन’, ‘नियम व अटी लागू’ या नाटकांच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. याचबरोबर संकर्षण ‘झी मराठी’वरील ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही करतो. अभिनेता एकाच वेळी अनेक माध्यमांतून प्रेक्षकांना पाहायला मिळत असतो.