नाटक व छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे घराघरांत लोकप्रिय झाला. ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमांमुळे त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. उत्तम अभिनेत्याबरोबरच संकर्षण एक उत्तम कवी म्हणून देखील ओळखला जातो. ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कवितांच्या कार्यक्रमाद्वारे तो आणि स्पृहा जोशी मिळून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतात. त्याने सद्य राजकीय स्थितीवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

संकर्षण ही पोस्ट शेअर करत लिहितो, “नमस्कार! सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काही लिहिण्याचा मनापासून प्रयत्न केला आणि प्रेक्षकांनी काल तो प्रयत्न अगदी मनापासून स्वीकारला…तुम्हीही ऐका, पहा आणि मनापासून सांगा की, तुमच्याही मनांत हेच आहे का?”

हेही वाचा : “एका असामान्य परिवाराकडून…”, पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले…

अभिनेता पुढे सांगतो, “माझी ही कविता तुमच्यासाठी नाही. ही कविता सर्वसाधारण लोकांसाठी आहे. तुम्हाला कशाचं काही वाटत नाही…तुम्हाला तुमचं नुकसान झालंय हे सुद्धा कळत नाही एकंदर तुम्हाला कशाचा फरकच पडत नाही. या कवितेच्या माध्यमातून मला एक कुटुंब भेटलंय. या कुटुंबात एक आजोबा आहेत. ते त्यांचं दु:ख मला या कवितेच्या माध्यमातून सांगत आहेत. त्यांचं नेमकं काय दु:ख आहे ते ऐकून घ्या…”

हेही वाचा : Video : २७ वर्षांनी पुन्हा रंगली ‘पूजा’ अन् ‘निशा’ची जुगलबंदी, माधुरी दीक्षित-करिश्मा कपूरचा जबरदस्त डान्स पाहिलात का?

संकर्षण कऱ्हाडे याने सादर केलेली कविता

सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं
खात्या-पित्या घरचे पण, दु:खी मला वाटलं.
माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं
अन् मी जवळ जाऊन म्हटलं काय हो काय झालं?
तुमच्यापैकी कोणाला काय झालंय का?
तिन्ही सांजेला असे बसलात कुणी गेलंय का?
कुटुंबप्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसास
डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते ढसाढसा
तर, ऐक तुला सांगतो म्हणाले, असं झालंय
आम्हा सगळ्या कुटुंबीयांचं एक-एक मत वाया गेलंय.
आता माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे ( नातवापासून त्यांनी ओळख करून द्यायला सुरुवात केली)
सभेला जायचं घोषणा द्यायच्या याला फारच जोर आहे
बरं एवढं करून मत दिलं, तरीही याचं भागलं नाही
पण, याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही.
मग, ती सभा, ती गर्दी, तो आवाज, ती घोषणा त्याचं पुढे काय झालं? मग, याचं मत पुढे तीन-चार वेळा असंच वाया गेलं.
आता माझ्या या दुसऱ्या नातवाची अन् त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाइफ आहे.
ना करिअर, ना ग्रोथ है…ना जिंदगी मैं वाइफ है.
अरे बाबा! वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कोणी आणत नाही.
भारतभर चालून तुझी पावलं दमली पण, हात काही चालत नाही.
मग ते धोतर, ती काठी, तो चष्मा, ते आडनाव त्याच पुढे काय झालं? आणि असं करत याचंही मत पुढे बरीच वर्षे वाया गेलं
आता माझ्या या मुलाला पण बरं का…राजकारणातलं फार कळतं. याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळतं
चुकली वेळ, झाला खेळ…वेगळंच संधान साधलं. एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वत:च्या हातावर बांधलं.
मग नवा साहेब, घड्याळ तेच पुन्हा वेळ पाळू का?
की, जुन्या साहेबांबरोबर राहून तुतारीतून आवाज काढू का?
मग, ते वय, तो अनुभव, ती निष्ठा, तो परिवार त्याचं पुढे काय झालं? असं करत माझ्या या मुलाचं मत मात्र वाया गेलं.
आता माझी ही सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची. जरा कुणी नडलं ना, की घरातला बाण काढायची. मी तिला कितीदा म्हटलं, सूनबाई बाण जपून वापरायचा असतो गं…एकदा हातातून सुटला की, परत येत नसतो गं.
मग, जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली अहो! जिथे शब्दांनी आग लागायची, तिथे हातात मशाल आली.
मग तो बाण, तो बाणा, ते कडवट, ते सैनिक यांच्यात असं काय झालं? पण, असं करत माझ्या या सुनेचं मत मात्र वाया गेलं.
आता ही माझी बायको बरं का…घडवेल तेच घरात घडतं. नाव हीच लक्ष्मी हिला कमळ फार आवडतं.
मी लगेच त्यांना विचारलं…माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल. अहो कमळ जिथल्या तिथेच आहे मग, यांचं मत वाया गेलं नसेल.
आजोबा म्हणाले, ती दु:खात नाहीये तशी पण, तिच्या मनात तळमळ आहे. कारण, ज्यांच्याविरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे.
अहो! ते विरोधक, हे सत्ताधारी, हे प्रामाणिक, ते बाजारी यांच्यात असं काय झालं? पण, असं करत माझ्या या बायकोचं आता वाटतंय मत मात्र वाया गेलं.
त्यामुळे पुढाऱ्यांनो तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की, हाच माझा पक्ष आहे. तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की, आमचं तुमच्याकडे लक्ष आहे.
त्यामुळे इथून पुढे तरी दिलेल्या मताची किंमत जरा तरी ठेवा आणि मतदारांनो मतदान करा आणि लोकशाही जिवंत ठेवा!

दरम्यान, संकर्षणने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. “सुंदर अप्रतिम…. जबरदस्त कविता”, “अत्यंत मार्मिक”, “लय भारी राजकीय परिस्थितीवर मार्मिक कविता ऐकवली” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.