Sankarshan Karhade Poem : प्रेम दाखवत नसले तरी आपल्या मुलांवर अफाट प्रेम करणारे व्यक्ती म्हणजे आपले वडील. अनेकदा त्यांचं हे प्रेम अव्यक्त असतं. आपल्या लेकरांसाठी दिवसभर काबाडकष्ट करून संध्याकाळी त्याच लेकरांच्या कुशीत येऊन आपला थकवा, क्षीण घालवतात ते वडील. वडीलांचे प्रेम, त्याग आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानण्याचा एक खास प्रसंग म्हणजे ‘फादर्स डे’.
आजच्या ‘फादर्स डे’निमित्त सगळेजण सोशल मीडियावर वडिलांबरोबरचे काही खास क्षण शेअर करत त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करत आहेत.अशातच अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने एक वडील म्हणून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. संकर्षण हा एक अभिनेता असण्याबरोबरच कवीसुद्धा आहे. अशातच त्याने आजच्या ‘फादर्स डे’निमित्त वडील म्हणून एक खास कविता शेअर केली आहे.
संकर्षणने सोशल मीडियावर कवितेचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओत तो असं म्हणतो, “लहान मुलं देवाघरची फुलं असं आपण म्हणतो; पण आजकालची लहान मुलं इतकी डेंजर आहेत की त्याला विचारू नका. थकून आलेल्या बापाला सुद्धा कोमेजून टाकतात अशी डेंजर मुलं आहेत. तर विशेषत: त्या वडिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठीची ही कविता.”
संकर्षण कऱ्हाडेची ‘फादर्स डे’निमित्त खास कविता :
“नाटकाचा प्रयोग प्रवास करून हा नट दमून जातो
पायाची लाकडं, चालत वाकडं घरी दमून येतो
वाटत असतं आपलं बुड आपल्याच घरात शांतपणे टेकवावं
थकून आलास रे आराम कर हे वाक्य मला कोणी तरी ऐकवावं
बायकोच्या नजरेत भाव असतात, आलं आमचं खुळं
आणि वाघाने फडशा पाडावा तसं अंगावर पडतात जुळं
माझ्या छातीपासून पोटापर्यंत ते खेळतात घसरगुंडी
अन् कुंभाराने माती तुडवावी तशी तुडवतात माझी मांडी
माझ्या उरल्या सुरल्या केसांची होते रोपवेची दोरी,
बापाच्या रूपाने त्यांना वाटतं गार्डनच आलंय घरी
पाठीच्या घोड्याला गुडघ्याच्या गाडीला घराचा प्रवास घडतो
तिकडून दिवसभर मी कशी सांभाळते हा मंत्र पडतो
मग मोबाईल चुंबक देऊन त्यांचं वळवायचं ध्यान,
ते रमलेत तोवर घ्या गिळून म्हणून समोर येतं जेवणाचं पान
वेगळं काहीतरी केलंय म्हणून समोर पानात असतात छोले
पहिला घास घेतला की पोरं करतात डायपर ओले
आपण भरेपर्यंत पोरांची भरलेली पोटं मोकळी होतात
ते जेवताना घासासोबत आपला जीवसुद्धा खातात
रात्र चढेल तसा रंगत जातो त्यांचा खेळ
कोल्हा आलाय बरं आता झालीय तुमची झोपायची वेळ
बरं पोरं झोपली आहेत तोपर्यंत तरी वाटतं ना काहीतरी व्हावं
बाळांना बाजूला करून आईला जवळ घ्यावं,
त्याच रात्री पोरं दोन वाजेपर्यंत जागतात
जरा झोपलेत असं वाटलं की उठून पाणी मागतात
मग कानाशी येऊन म्हणतात खरंच कोल्हा आला का?
नका चिडू ना बाबा तुम्हाला खरंच खूप त्रास दिला का?
बाबा म्हणतात सगळे आनंद बाप होण्यापुढे पायाची धूळ आहे
बाळांनो तुमच्यामुळे माझं घर भरलेलं गोकुळ आहे
बाळांच्या कुशीत त्यांचा बाप शांतपणे झोपतो
दुसऱ्या दिवशी बापातला नट जोमाने काम करतो
दरम्यान, संकर्षणची ही कविता त्याच्या अनेक चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे. तसेच अनेक कलाकारांनीही या कवितेच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. स्पृहा जोशी, शुभांगी गोखले यांसह अनेक कलाकारांनी कमेंट्स करत संकर्षणची कविता आवडली असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनीही कविता आवडल्याच्या आणि ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.