Sankarshan Karhade Shares Experience: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा सध्या नाटक या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे पाहायला मिळते. सध्या तो कुटुंब कीर्रतन या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेदेखील प्रमुख भूमिकेत आहेत.
संकर्षण सोशल मीडियावरदेखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तो त्याच्या कामाबरोबरच अनेक अनुभव, त्याचे विचार सोशल मीडियावर मांडत असल्याचे पाहायल मिळते. सध्या संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावरील त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने चाहत्यांचा अनुभव सांगितला आहे.
मला तुमच्याबरोबर…
संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत तो एका बाकावर बसलेला आहे. त्याच्या हातात एक कागद असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या फोटोत त्याने त्याच्या चाहत्यांनी त्याला जे पत्र दिलं आहे, त्याचा फोटो शेअर केला आहे. तर तिसऱ्या फोटो हा अभिनेत्याचा आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, “असे भारी आपले प्रेक्षक. दोन दिवस सुट्टी मिळाली म्हणुन कुटुंबाबरोबर बाहेरगावी आलोय.”
पुढे अभिनेत्याने लिहिले,”एका टेबलवर जेवायला बसलो तर, पलीकडच्या टेबलवर चार तरूण बसले होते. मराठी, मध्येच हिंदी , इंग्लीश सगळं बोलत होते. अधेमध्ये माझ्याकडे बघत होते. त्यांनी मला ओळखलंय का नाही, हा मी अंदाज बांधत होतो. खरंतर त्यांनी मला ओळखावं अशी मनात अपेक्षाही करतच होतो. जेवण झालं आणि ते निघून गेले.”
“मी निघताना हॉटेल च्या स्टाफने पत्र आणून दिलं. जान्हवी आणि वेदांत यांनी अत्यंत सुंदर अक्षरांत त्यांचं म्हणणं पत्रातून माझ्यापर्यंत पोहोचवलं. मला त्या तरुणांच्या दोन्ही गोष्टींचं कौतुक वाटलं.”
“पहिली अशी की त्यांना मी कुटुंबाबरोबर आहे ही जाणीव त्यांना होती. दुसरी अशी की त्यांना व्यक्त व्हावं असंही वाटलं. त्यांनी लिहिलेलं पत्र वाचून आणि अनुभवून मीच त्यांचा चाहता झालो. आता मला रुखरुख लागली आहे कि , मला त्यांच्याबरोबर फोटो काढायचा होता, तो राहिला.”
पुढे त्याला पत्र लिहिलेल्या चाहत्यांना उद्देशून संकर्षनने लिहिले की मित्रांनो मी आशा करतो की ही पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल. कधीतरी माझ्या नाटकाला या. मला तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे.”
दरम्यान, संकर्षणच्या अभिनयाबरोबरच त्याच्या कवितांचा चाहतावर्ग मोठा आहे. अनेक सामाजिक-राजकीय विषयांवर अभिनेता कविता लिहिताना, त्या प्रेक्षकांसमोर मांडताना दिसतो.