Sankarshan Karhade Emotional Post: नाटक, कविता, टीव्हीवरील कार्यक्रम या सगळ्याबरोबरच संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतो. तो अनेकदा विविध फोटो करतो. तसेच त्याच्या नाटक दौऱ्यांबद्दल, त्याच्या कामाबद्दलची माहिती तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

याबरोबरच, तो त्याचे अनुभवही सांगतो. नाटकाच्या दौऱ्यादरम्यान काय गमती जमती घडतात. चाहते जेव्हा भेटतात, तेव्हा काय बोलतात, तसेच चाहत्यांनी दिलेल्या खास भेटवस्तू, खास आठवणी या सगळ्याबद्दल संकर्षण वेळोवेळी लिहित असतो.

“ही वेळ गाठून आईशी गप्पा मारायला मला…”

आता संकर्षणने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्याबरोबर त्याची आई दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, “आईबरोबर गप्पा मारण्याची योग्य वेळ म्हणजे संध्याकाळ. तिन्ही सांजेला आई हात पाय-धुवून, रामरक्षा म्हणत, घासलेली भांडी पुसताना एका जागेवर बसलेली असते. ही वेळ गाठून आईशी गप्पा मारायला मला फार आवडतं. ती खूप विनोद करते.”

पुढे त्याने लिहिले, “मला कौतुक याचं वाटतं कि, भांडी पुसणे हे कामसुद्धा ती किती मन लावून करते. आपण खूप काही करण्यासारखं असतानासुद्धा बोअर झालेले असतो.”

संकर्षण कऱ्हाडेवर नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

संकर्षणच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. “खूप भाग्यवान आहेस. इतका मोठा अभिनेता असूनही स्वतः मधल्या साधेपणाला जपत, घराचं घरपण आणि आई-बाबांच प्रेम जपतोस. तुझं फार कौतुक वाटतं”, “सुंदर क्षण,सुंदर फोटो”, “नेहमी प्रत्येक प्रयोगाच्या आधी बाबांबरोबर बोलणारं लेकरू, आज आईच्या कुशीत पाहून डोळे भरून आले.”

“आई खूप सुंदर आहे”, “खरंच आपली आई काम किती मन लावून करते”, “किती छान”, “मस्त”, “सुख”, “हे ज्याला जमतं, त्याने आयुष्य जगलं”, “खुपच छान दादा. हे असं आता जास्त बघायला मिळत नाही. आई-बाबांशी गप्पा मारायला वेळ नसतो.” अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेकांनी संकर्षणच्या आईचे कौतुक केले आहे. तर, अनेकांनी संकर्षणच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. काहींनी त्यांच्या आईबरोबरच्या आठवणी सांगितल्या आहेत. तर काहींनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.

संकर्षण सध्या त्याच्या कुटुंब किर्रतन या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. महाराष्ट्राच्या विविध भागांत या त्याचे दौरे सुरू असतात. इतकेच नाही तर परदेशातही त्याच्या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. कुटुंब किर्रतन या नाटकात संकर्षणबरोबरच तन्वी मुंडले व ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत आहेत.

याबरोबरच, संकर्षणच्या नियम व अटी लागू या नाटकाचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा होते. अभिनेत्री अमृता देशमुख या नाटकात त्याच्याबरोबर प्रमुख भूमिकेत आहे. दरम्यान, संकर्षण कऱ्हाडे झी मराठी वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये या शोचे सूत्रसंचालनही करत आहे.