Sankarshan Karhade shares photo: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या आम्ही सारे खवय्ये या शोचे सूत्रसंचालन करीत आहे. झी मराठीवरील कार्यक्रमात सुरुवातीला अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या निमित्ताने त्यांचे काही खास किस्से, आठवणी ऐकायला मिळाले. सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांतील गृहिणी यामध्ये सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विविध पदार्थ, त्याच्याशी जोडलेल्या त्यांच्या आठवणी त्या सांगतात.
याबरोबरच, संकर्षण कुटुंब कीर्रतन, नियम व अटी लागू या नाटकांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. ‘कुटुंब कीर्रतन’मध्ये त्याच्याबरोबर तन्वी मुंडले, वंदना गुप्तेही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. तर, ‘नियम व अटी लागू’मध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री अमृता देशमुख प्रमुख भूमिकेत आहे.
अभिनेत्याच्या काही मालिकांमध्येही काम केले आहे. तसेच, त्याच्या कवितांसाठी तो लोकप्रिय आहे. त्याच्या अनेक कविता सोशल मीडियावर व्हायरल होतात. तसेच, त्याच्या व स्पृहाच्या ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी होताना दिसते. संकर्षण सोशल मीडियावर सक्रिय असतो. नाटकांच्या प्रयोगादरम्यान आलेले अनुभव, चाहत्यांबरोबर झालेल्या भेटी, तसेच काही आठवणी तो सांगत असतो. अनेकदा तो त्याच्या गावाकडील आठवणी, आई-बाबांबद्दलही सांगतो.
संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला परभणीमधील शेतातील गोड फोटो
नुकतेच संकर्षणने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो परभणीतील आहेत, असे त्याने लिहिले आहे. एका फोटोत त्याच्याबरोबर एक गाय आणि तिचे वासरू दिसत आहे. दुसऱ्या फोटोत त्याने वासराला उचलून हातात घेतले असल्याचे दिसत आहे. तर आणखी एका फोटोत झाडावरील घरटे दिसत आहे. ते फोटो शेअर करीत त्याने लिहिले, “आजची सकाळ अशी सुरू झाली. परभणीतल्या आमच्या शेतातल्या मंजुळाला वासरू झालंय. नाव गौरी ठेवलं आहे.”
संकर्षणच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “किती लोभस आहे वासरू, मातृप्रेम आणि इवलंसं घरटं पिल्लांची वाट पाहत आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “संकर्षणबुवा, कालवड झाली अभिनंदन! आणखी एक गोमाता”, एकाने लिहिले, “किती गोड”, आणखी एकाने लिहिले, “तुम्ही दोघेही क्यूट दिसत आहात”, एकाने लिहिले, “गौरी व संकर्षण दोघेही क्यूट”, अशा अनेक कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी संकर्षणचे कौतुक केले आहे. तसेच अमृता खानविलकर व सलील कुलकर्णी यांनी कमेंट्स करीत त्याचे कौतुक केले. सलील कुलकर्णी यांनी हार्ट इमोजी शेअर केल्या. याबरोबरच, अमृता खानविलकरने वासरू किती क्यूट आहे, असे लिहिले.




दरम्यान, संकर्षणच्या नाटकांना प्रेक्षकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळते. तसेच, परदेशांतही त्याच्या नाटकांचे दौरे होत असतात. त्याचे व्हिडीओ, फोटो तसेच चाहत्यांचा प्रतिसाद याबद्दल संकर्षण वेळोवेळी लिहीत असतो.
