Sankarshan Karhade Shares Experience Of Japan: आज स्वातंत्र्यदिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेदेखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, त्याला आलेला एक अनुभव सांगितला आहे.

संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरू एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, “नमस्कार, संकर्षण कऱ्हाडे, भारतमाता की जय! वंदे मातरम. आपल्या सगळ्या भारतवासीयांना, संपूर्ण हिंदुस्तानाला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“आपले भारतीय आपली संस्कृती…”

पुढे तो म्हणाला, “मी तुमच्याबरोबर एक अनुभव शेअर करणार आहे, तो तुम्हाला आवडतोय का बघा. आम्ही नाटकाच्या प्रयोगासाठी टोकियो, जपानला गेलो होतो. आपले भारतीय आपली संस्कृती राखत, ती जपत इतरांची संस्कृतीही आपलीशी करतात, याचा एक उत्तम अनुभव आला. आम्ही जपानला गेलो, तिथे निरंजन जोशी म्हणून आयोजक होते. आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला हात जोडून नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद, खूप मनापासून स्वागत आहे, असे म्हणत स्वागत केलं.”

पुढे तो म्हणाला, “आमचे नाटकाचे प्रयोग झाले. आम्ही परत निघालो. निघताना ते असं म्हणाले की, तुम्ही इथून जाताना तुम्हाला जपानी पद्धतीनं कमरेतून वाकून नमस्कार करणार आहे. आम्ही म्हणालो, असं का? त्यावर ते म्हणाले की, आपण भारतीय आपली संस्कृती तर जपून ठेवतोच; पण आम्ही गेली १५-२० वर्षं जपानमध्ये आहोत. तर, तिथली संस्कृती स्वीकारणं, हेसुद्धा चांगलं माणूस असल्याचं लक्षण आहे. मला हा अनुभव इतका आवडतो, इतका आठवतो आणि इतका शिकवतो की, भारतीय मूळ कसं आहे की, आपलं तर राखायचंच, त्याचा मान कुठेही कमी होऊ द्यायचा नाही. पण, इतरांचं जे चांगलं आहे, तेही स्वीकारायचं आणि ते घेऊन पुढे जायचं. तर हा अनुभव आपल्याला भारतीय म्हणून समृद्ध करतो. असेच छान भारतीय व्हा, आनंदी राहा. आपलंही राखा आणि इतरांनाही स्वीकारा आणि मोठे व्हा. धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, भारतमाता की जय. स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. “

हा व्हिडीओ शेअर करीत संकर्षण कऱ्हाडेने, “स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा, हा अनुभव ऐका, आवडला तर नक्की सांगा”, अशी कॅप्शन दिली आहे. संकर्षणच्या या व्हिडीओवर कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, संकर्षण कऱ्हाडे अनेकदा त्याच्या व्हिडीओच्या माध्यमातून विविध अनुभव सांगत असतो. कविता वाचून दाखवतो, तर काही वेळा किस्सेही सांगतो. सध्या तो झी मराठी वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर तो नियम व अटी लागू या नाटकातूनही प्रेक्षकांच्या भेटीस येतो.