Sankarshan Karhade shares experience of Shirdi Sai Baba Darshan ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक आणि ‘आम्ही सारे खवय्ये’ हा शोमुळे सध्या संकर्षण कऱ्हाडे चर्चेत आहे. कुटुंब किर्रतन या नाटकाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या नाटकात त्याच्याबरोबर अभिनेत्री तन्वी मुंडले आणि जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते प्रमुख भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही कुटुंब किर्रतन नाटकाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो. नाटकाच्या दौऱ्यादरम्यानचे अनेक फोटो, अनुभव अभिनेता सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच, अनेक किस्सेही तो या माध्यमातून तो सांगतो.
आता संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच त्याने शिर्डीला जाऊन साई बाबांचे दर्शन घेतले, तसेच त्याचा अनुभव त्याने लिहिला आहे.
“हात जोडून जय साईराम म्हणणारे सगळे…”
संकर्षणने लिहिले, “काय माझं भाग्यं…छत्रपती संभाजीनगरचा प्रयोग करुन नाशिककडे जात असताना साईबाबांचं दर्शन घ्यावं असं अचानक वाटलं. समृद्धी महामार्गावरून गाडी वळवली थेड शिर्डीला पोहोचली.
पुढे त्याने लिहिले, “मी पहिल्यांदाच साई बाबांचं दर्शन घेतलं. फारच छान वाटलं. पायी प्रवास करुन आलेले, महाराष्ट्राच्या बाहेरून, वेगवेगळ्या प्रांतातून आलेले, रांगेत ऊभे असलेले साईभक्त तिथे होते. मंदिराचा स्वच्छ परिसर, हात जोडून जय साईराम म्हणणारे सगळे कर्मचारी आणि डोळ्यांतल्या ममत्व भावनेने भक्तांची वाट पाहणारे साईबाबा मला दिसले.”
शेवटी संकर्षणने लिहिले, “खूपच छान वाटलं. जय साईराम”, असे लिहित अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. अभिनेत्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
नेटकरी म्हणाले…
नेटकऱ्यांनी लिहिले, “बाबांच्या इच्छेपुढे नतमस्तक”, “तुम्हाला बाबांनी बोलवून घेतलं. खूप नशीबवान आहात”, “घरी आई आणि शिर्डीमध्ये साई”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.


अभिनेत्याच्या आम्ही सारे खवय्ये या शोबद्दल बोलायचे तर संकर्षण या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमात अनेक कलाकार हजेरी लावतात. त्यांच्या करिअरमधील किस्से सांगतात. त्यांच्या नात्याच्या गोड आठवणी सांगतात. संकर्षण त्यांना काही टास्कही देतो. त्यामुळे या कार्यक्रमालादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळते.
