सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहून, अनेक कलाकार मंडळीही त्यांच्या चाहत्यांसह संपर्कात राहण्यासाठी याचा वापर करीत असतात. ते सोशल मीडियावर विविध रील्स शेअर करताना दिसतात. अनेक कलाकार तर सेटवरील गमती-जमती व्लॉगमार्फत, रीलमार्फत शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यामुळे वेळोवेळी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही थेट कलाकारांपर्यंत पोहोचत असतात. परंतु, जशी नाण्याची दुसरी बाजू असते, तसेच सोशल मीडियाचेही काही तोटे आहेत. ज्यामुळे अनेकदा कलाकारांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं.
प्रेक्षकांचा कलाकारांबरोबर यामार्फत थेट संपर्क होत असतो. त्यांच्या दैनदिन जीवनातील घडामोडी चाहत्यांना कळत असतात. तसेच कलाकारांपर्यंत त्यांच्या प्रतिक्रिया पोहोचवणंही सोप होत असतं. अशातच एका नेटकऱ्यानं मराठमोळा अभिनेता संकेत कोर्लेकरच्या एका रीलखाली कमेंट केली आहे. संकेत अभिनयासह सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित रील बनवत असतो. तर, सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. या सर्व रील्सवर त्याचे चाहते चांगला प्रतिसाद देत असतात. परंतु, काही जण ट्रोलिंगही करतात; तर काही त्यांच्या स्पष्ट प्रतिक्रिया देत असतात.
संकेतनं नुकतीच एक रील पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यानं एका ब्रँडची जाहिरात केली होती. त्याच्या या रीलखाली एका नेटकऱ्यानं “एका स्प्रेच्या जाहिरातीसाठी एवढी फालतू रील का बनवली”, अशी कमेंट केली होती. नेटकऱ्यानं केलेल्या या कमेंटला संकेतनं उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, “मी असल्या कमेंट्सना कधीच रिप्लाय करीत नाही; पण अशा कमेंट्स करणाऱ्या सर्व फॉलोअर्सना मी आताच सांगतोय. माझ्या १० व्हिडीओंपैकी किमान एक व्हिडीओ तरी प्रमोशनचा असणार, ज्यातून मी पैसे कमवणारच. मला तुम्ही दरमहा पैसे पाठवत नाही की, मी सगळ्या प्रमोशनला नाही म्हणेन. खर्च मलापण आहेत आणि घर माझेपण आहे.”

याबाबत बोलताना संकेत पुढे म्हणाला, “ज्याला हे पटत नसेल, त्यांनी खुशाल अनफॉलो करा. सोशल मीडियावर खूप मोठं व्हावं, अशी माझी इच्छा आहे; पण ज्यांना आर्थिक गणितं कळतात अशा फॉलोअर्ससोबत. कारण- सोशल मीडिया माझं सर्वस्व नाही. उद्या हे सगळं सोशल मीडिया बंद झालं, तर एखाद्या लहानशा शाळेत नाटकं बसवत सुटेन आणि लहान मुलांसोबत माझा पूर्ण वेळ घालवेन. इतर लोकांसारखं बोलतात एक आणि करतात एक वाला मी नाही. जोवर हे आहे, तोवर तुमचं मनोरंजन करता करता मी पैसे कमवणार. उद्या एक दशलक्ष झाले तरी तो माझाच प्रेक्षक आणि कमी होऊन एक हजार जरी राहिले तरी तो माझाच प्रेक्षक; मनोरंजन थांबणार नाही.”