Sanket Pathak On Raqesh Bapat: संकेत पाठक बिग बॉसच्या घरातून नुकताच बाहेर पडला आहे. वाईल्डकार्ड म्हणून त्याने बिग बॉस मराठीच्या ६ व्या पर्वात एन्ट्री केली होती. त्याबरोबर रेवा आणि संस्कृती या दोघींनीही शोमध्ये एन्ट्री केली होती. संस्कृती याआधीच शोमधून बाहेर पडली आहे, तर संकेत नुकताच शोमधून एलिमिनेट झाला आहे.
आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर संकेत पाठकने अनेक गोष्टींवर त्याचे मत व्यक्त केले आहे. घरात असलेले इतर स्पर्धक राखी सावंत, विशाल कोटियन, राकेश बापट, सागर कारंडे, प्रभू शेळके, तन्वी कोलते, दीपाली सय्यद अशा सर्व स्पर्धकांच्या खेळाबद्दल त्याने त्याचे मत व्यक्त केले आहे.
“तो काहीच…”
संकेत पाठकने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला काटा ग्रुपमधील सदस्यांच्या खेळाबद्दल विचारले. त्यावर तो म्हणाला, “मला असं वाटतं की, सगळेच असे संथ गतीने पुढे चाललेत. ते एकत्र आहेत म्हणून ते पुढे चाललेत, कदाचित म्हणून ते एकत्र आहेत.”
त्याला राकेश बापटच्या खेळाबद्दल विचारले. त्यावर तो म्हणाला, “राकेशने काहीतरी केलं पाहिजे, थोडसं खेळलं पाहिजे, तो काहीच खेळत नाही.” राकेश आतापर्यंत शोमध्ये का टिकला आहे असे वाटते? यावर संकेत म्हणाला, “तो माझ्यासाठी एक गूढ प्रश्न आहे. याचं उत्तर मी शोधेन”, असे म्हणत राकेश शोमध्ये काही करत नसल्याचे मत संकेत पाठकने व्यक्त केले.
बिग बॉसच्या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक शोमध्ये असताना जितके चर्चेत असतात. तितकेच ते शोच्या बाहेर आल्यानंतरही त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. संकेत पाठक बिग बॉसमध्ये जाण्याआधी मराठी मालिकांमध्ये दिसला होता. दुहेरी, लग्नाची बेडी या मालिकांतील त्याच्या भूमिका गाजल्या. आता आगामी काळात तो कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राकेश बापटबद्दल बोलायचे तर राकेश बापट पहिल्या दिवसापासून बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. त्याचा खेळ प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे. जेव्हा तो टास्क रद्द करण्यासाठी गोष्टी करतो, तेव्हा त्याच्यावर टीकाही होताना दिसते. मात्र, राकेश बापटचा चाहतावर्ग मोठा आहे, तसेच त्यांच्या काटा ग्रुपलादेखील प्रेक्षकांचे प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आता बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
