Sanket Pathak on wife Suparna: रुचिता जामदार नुकतीच ‘बिग बॉस’च्या सहाव्या पर्वातून बाहेर पडली आहे. ती एलिमिनेट झाल्यानंतर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. त्याबरोबरच काही दिवसांपूर्वी तीन सदस्य वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सहभागी झाले. रेवा कौरसे, संकेत पाठक, संस्कृती साळुंखे अशी या वाईल्ड कार्ड स्पर्धकांची नावे आहेत.

‘बिग बॉस’च्या घरात जाण्याआधी संकेतने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बिग बॉसमध्ये जाण्याबद्दल वक्तव्य केले. तसेच, जेव्हा पत्नीला बिग बॉसमध्ये जाण्याबद्दल सांगितले. तेव्हा काय प्रतिक्रिया होती, हेही सांगितले. तो नेमकं काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊ…

“माझा हीरो टीव्हीवर…”

संकेत पाठक म्हणाला, “सुपर्णाची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया होती की, आता मला टीव्ही बघायला काहीतरी कारण मिळालं. माझा हीरो टीव्हीवर दिसणार, तर मी टीव्ही पाहणार. ती खूप आनंदी होती. ती बिग बॉस बघते. मीही तिच्यामुळेच तो शो पाहिलेला आहे.” पुढे पत्नीने कसा खेळ खेळावा, याच्या टिप्स दिल्या, असेही संकेत म्हणाला.

कुटुंबातील इतर सदस्यांची काय प्रतिक्रिया होती? यावर संकेत म्हणाला, “जेव्हा मी बॅग वगैरे भरल्या, तेव्हा त्यांना प्रश्न पडला की, हा कुठे चालला आहे. मी त्यांना सांगितलं की, मी कामासाठी चाललो आहे. त्यावर त्यांनी खूप प्रश्न विचारले. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की, तुम्ही रोज हा जो शो बघता, मी तिथेच चाललो आहे. ते ऐकल्यानंतर मला धक्का बसला होता. पण, त्यानंतर मी काहीतरी वेगळं करतोय, हे ऐकल्यानंतर त्यांना आनंद झाला.”

जेव्हा वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली तेव्हा मोठी चर्चा झाली होती. पण, घरात प्रवेश केल्यानंतर पहिल्या आठवड्यात संकेतने त्याच्या खेळाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. कॅप्टन्सी टास्कवेळी तो स्वत:साठी खेळताना दिसला. तुलनेने संस्कृती आणि रेवाचा खेळ तितका प्रभावशाली दिसला नाही. रेवाने तिची पॉवर की, स्वत:च इतर स्पर्धकांना दिल्याने तिला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. त्याबद्दल भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनेदेखील तिला सुनावले.

‘बिग बॉस’च्या खेळात दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. स्पर्धकांना कॅप्टन्सी, तसेच इतर स्पर्धकांना नॉमिनेट करण्यासाठी वेगवेगळे टास्क दिले जातात. या टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये वादविवाद होताना दिसतात. तसेच, अनेकदा चुकीच्या पद्धतीने खेळल्याने तसेच बळाचा वापर केल्याने दुखापतही होते.

नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामध्ये आईचे पत्र न मिळाल्याने अनुश्री भावूक झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. आता खेळात काय ट्विस्ट येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.