मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक व अभिनेत्री सुपर्णा श्याम यांनी नुकतीच एक आनंदाचा बातमी सोशल मीडियामार्फत त्यांच्या चाहत्यांसह शेअर केली आहे. दोघे आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झाल्याची माहिती त्यांनी गणेश चतुर्थीचं औचित्य साधून दिली आहे.
सुपर्णा व संकेत दोघे आई-बाबा झाले असून त्यांना मुलगा झाला आहे. सुपर्णाने स्वत: इन्स्टाग्रामवर लेकाचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीने पहिल्यांदाच तिच्या मुलाचा फोटो शेअर करत खास कॅप्शन देत ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने यामधून यावर्षीचा गणेशोत्सव त्यांच्यासाठी खास असल्याचं म्हटलं आहे.
सुपर्णा-संकेतने पहिल्यांदाच शेअर केला लेकाचा फोटो
सुपर्णा व संकेत यांनी इन्स्टाग्रामवर एकत्रित पोस्ट शेअर करत “ह्या वर्षी साक्षात गणपती आमच्या घरी आले. आम्हला मुलगा झाला आहे कृतज्ञ” अशी कॅप्शन देत ही आनंदाची बातमी दिली आहे.सुपर्णाने शेअर केलेल्या फोटोत त्यांच्या घरी गौरी गणपतीचं आगमन झालेलं असताना त्यांचा मुलगा त्यासमोर बसल्याचं दिसतं. अभिनेत्रीने लेकाला यावेळी छान पारंपरिक अंदाजात तयार केल्याचं यामधून दिसतं. समोर असलेल्या गणपतीकडे पाहत असलेल्या लेकाचा पाठमोरा फोटो शेअर करत तिने हा फोटो पोस्ट केलाय.
सुपर्णा व संकेत यांच्या या पोस्टखाली मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्टखाली अभिनेत्री रेवती लेलेने दोघांना टॅग करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर रेश्मा शिंदेनेही कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान याखाली त्यांच्या चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
