Sanmita Shinde on Saleel Kulkarni: सलील कुलकर्णी हे गायक, लेखक व संगीतकार म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांची अनेक गाणी गाजली आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. सलील कुलकर्णी सोशल मीडियावरही सक्रिय असतात. विविध विषयांवर, घडत असलेल्या घटनांबद्दल ते त्यांची मते स्पष्टपणे मांडत असतात, त्यामुळे ते अनेकदा चर्चेत असतात.

आता सलील कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर केली नाही, तर त्यांच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. आता ही पोस्ट कोणी शेअर केली आहे आणि त्यामध्ये काय म्हटलं आहे, हे जाणून घेऊयात…

गायिका सन्मिता शिंदेने सलील कुलकर्णी यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. तिने त्यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहिले, “माझ्या अपघातानंतर सलील दादा जेव्हा मला दवाखान्यामध्ये भेटायला आले तेव्हा निघताना म्हणाले की, आपलं गाणं करायचं राहीलंय; पण आता तू बरी झाली की करूया. माझा हॉस्पिटलचा मुक्काम चांगलाच वाढला होता. २१ दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते आणि पुढे घरी येऊन सेटल होईपर्यंत पुढ़चे १५ दिवस म्हणजे चांगला एक-दीड महिना उशीर झाला.”

“खरं तर या गाण्यात एक सन्मिता असली किंवा नसली तरी…”

पुढे तिने लिहिले, “खरं तर या गाण्यात एक सन्मिता असली किंवा नसली तरी काहीही फरक पडला नसता. पण, तरीही मी सुरुवातीपासून या प्रोजेक्टचा भाग आहे आणि माझी मनापासून हे गाणं करायची इच्छा आहे, म्हणून दादाने मला शब्द दिला आणि गाण्यासाठी थांबलासुद्धा. माझं गाणं म्हणून तर या गाण्याबरोबर मी जोडली गेली आहे. पण, छोट्या ब्रेकनंतर पुन्हा स्टुडियोमध्ये उभं राहायचं बळसुद्धा कळत नकळत सलील दादाने दिलं, म्हणूनसुद्धा हे गाणं माझ्यासाठी स्पेशल आहे.”

तिने असेही लिहिले, “रेकॉर्डिंग आणि शूटिंगदरम्यान जितकी काळजी सलील दादा घेत होता, तितकीच किंवा त्याहीपेक्षा जास्त काळजी माझ्या या नवीन मैत्रिणी घेत होत्या; त्यामुळे ही सगळी प्रोसेस मला मनापासून जगता आली. अश्विन, तुषार दादा, कॅमेरा दादा शोएब, मेकअप दादा समीर यांचीही खूप मदत झाली. शूटिंगच्या वेळी विभा ताई काळजीने ‘नीट बस ग तू, कोणाचा धक्का लागू देऊ नको पायाला’, असं सांगायची आणि मधुराणी ताईने भेटल्या भेटल्या घट्ट मिठी मारली आणि म्हणाली बरं वाटलं तुला पुन्हा बघून. किती छोटे छोटे क्षण आहेत, पण याचं महत्त्व अशा वेळेस समजतं.”

शेवटी तिने सलील कुलकर्णी यांचे आभार मानत लिहिले, “या गाण्यासाठी सलील दादा थँक्यू.” सन्मिता शिंदे ही कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची’ या शोची विजेती आहे.