‘बा बहू और बेबी’ फेम अभिनेता राजेश कुमार शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन अभिनीत नुकत्याच रिलीज झालेल्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’मध्ये दिसत आहे. ‘जॉइन फिल्म्स’ला दिलेल्या मुलाखतीत राजेशने अभिनयातून ब्रेक घेत बिहारमधील आपल्या गावात राहायला गेला तेव्हाची आठवण सांगितली. “२०१७ मध्ये मी टेलिव्हिजनवरील माझ्या अभिनय कारकिर्दीच्या शिखरावर होतो, तेव्हा मी शेती करण्याचा निर्णय घेतला. मी टेलिव्हिजनवर काम करून आनंदी होतो. पण त्याचवेळी माझं मन मला सतत विचारत होतं, ‘मी मनोरंजनाशिवाय माझ्या पुढच्या पिढीसाठी काय करतोय?’”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन-तीन वर्षांत या राजेश कुमारने गावी परतण्यासाठी अभिनय सोडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. खासकरून एखाद्या अभिनेत्यासाठी शेती हा ग्लॅमरस व्यवसाय नाही. त्यामुळे त्याने तो मार्ग कशामुळे निवडला असं विचारल्यावर तो म्हणाला, “मी समाजात योगदान देण्यासाठी काही खास किंवा जास्तीचं काम करत नव्हतो. माझी मुलं माझी आठवण कशी ठेवतील? मी स्वतःसाठी, उदरनिर्वाहासाठी आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी अभिनय केला. माझ्या मनात विचार आला की ‘मी मागे काय ठेवून जाणार? तेव्हा मी माझ्या गावी परतलो आणि शेती करू लागलो.”

प्रसिद्ध अभिनेत्रीने एअरलाइन कॅप्टनशी केलं लग्न, राजस्थानमध्ये मराठी लूकने वेधलं लक्ष, पाहा Photos

पाच वर्षे राजेश कुमारने शेतकरी म्हणून काम केलं. स्वतःच्या पिकांची काळजी घेणं, इतर शेतकऱ्यांना शिक्षित करणे आणि त्यांच्या विकासात मदत करणं ही कामं केली, हे करताना अनेक आव्हानं आली. त्यातच माध्यमांनी त्याच्या दिवाळखोरीच्या बातम्या दिल्या. “अनेक माध्यमांनी म्हटलं की मी एक शेतकरी होतो, ज्याला अभिनयाच्या क्षेत्रात नशीब आजमवायचं होतं. काहींनी लिहिलं की मी शेतकरी होण्यासाठी अभिनय सोडला आणि काहींनी म्हटलं की माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी शेती केली,” असं राजेश म्हणाला.

रितेश देशमुखच्या वहिनीचा सख्खा भाऊ आहे जॅकी भगनानी, बहीण व भाच्यांबरोबर शेअर केलेत खास फोटो

“शेतीचा पूर्वीचा अनुभव आणि कौशल्य नसल्यामुळे माझं खूप नुकसान झालं आणि मी कर्जबाजारी झालो. मला कर्ज फेडायचे होतं. मला अनेक अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्यातच करोना आला. त्यानंतर गोष्टी आणखीनच बिघडल्या. ती पाच वर्षे अडचणींनी भरलेली होती, पण मी पुढे जात राहिलो. या कठीण काळात माझ्या शिक्षणाने मला प्रेरणा दिली. त्या कठीण परिस्थितीतही मी आशा सोडली नाही आणि शेवटी मला मार्ग सापडला,” असं राजेशने सांगितलं.

राजेश कुमारच्या सोशल मीडिया हँडल शेतात काम करतानाचे अनेक फोटो आहेत. पण सुरुवातीला शेतीतून पैसे मिळाले नाहीत, असं तो सांगतो. “मला समजलं की शेती करणं कठीण आहे, परंतु माझ्यात लढण्याची वृत्ती आहे आणि त्यातूनच ‘मेरा फॅमिली फार्मर’ कल्पना सुचली. त्यातून सुरुवातीला फायदा झाला नव्हता, काहीही उत्पन्न होत नव्हतं पण त्याने माझी आवड जिवंत ठेवली. आता त्या शेतकऱ्यांची कमाई चार पटीने वाढली आहे, ५० एकरपेक्षा जास्त जमीन रसायनमुक्त झाली. बरेच लोक पूर्णपणे नैसर्गिक आहाराकडे वळले आहे, लोक शेतकऱ्यांकडून धान्य आणि किराणा सामान विकत घेत आहे. पाच वर्षांच्या कालावधीत मी या गोष्टींसाठी काम केलं,” असं राजेश कुमारने सांगितलं.

राजेश कुमारने सांगितलं की निसर्गाच्या सानिध्यात राहून आणि मातीच्या जवळ राहिल्यामुळे त्याला एक चांगला अभिनेता बनण्यास मदत झाली आहे. “शेती आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याने मला अधिक संयम आणि निरीक्षण करण्याची क्षमता शिकवली. त्यामुळे माझ्या अभिनयातही स्थिरता आली आहे. जेव्हा मी शेती करत होतो, तेव्हा मला असे लोक भेटले ज्यांनी मला माझी कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत केली, त्यामुळे मी आणखी चांगला अभिनेता बनलो,” असं तो म्हणाला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarabhai vs sarabhai actor rajesh kumar recalls turning farmer in bihar had to repay debt after loss hrc
First published on: 13-02-2024 at 10:11 IST