Kamali Fame Actress Sarika Nawathe Husband : ‘कमळी’ मालिका आता महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेला टीआरपी सुद्धा चांगला मिळतोय. यामध्ये हृषीच्या आईची म्हणजेच नयनताराची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री सारिका नवाथे साकारत आहे. सारिका यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्या सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या काही फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सारिका नवाथे अलीकडेच मालिकेच्या व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढत हिमाचल प्रदेशला गेल्या होत्या. या ट्रिपदरम्यानचे सुंदर फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांचे पती हर्षवर्धन नवाथे यांना याठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी या दोघांनी गोल्डन टेंपल, डलहौसी, खज्जियार या जागांना भेट दिली.
सारिका नवाथे हे फोटो शेअर करत लिहितात, “हर्षवर्धन यांना ‘एनर्जी प्लांट’ येथील स्वातंत्र्यदिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं होतं. बायको म्हणून माझ्यासाठी हा खूप अभिमानास्पद क्षण होता आणि यानिमित्ताने एक सुंदर-लहानशी ट्रिप सुद्धा झाली. सुवर्णमंदिरात दर्शन घेतलं, खज्जियार फिरलो, डलहौसी येथील पर्वतरांगा पाहिल्या…खरंच छान अनुभव होता.”
सारिका यांनी शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सारिकाचे पती हर्षवर्धन नवाथे ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो जिंकणारे पहिले करोडपती आहेत. हा शो जिंकल्यावर त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं. आताच्या घडीला त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे.
याशिवाय सारिका यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, सारिका नवाथे यांनी आजवर बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय त्यांनी मराठी सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘कमळी’ मालिकेत हृषीच्या आईची म्हणजेच नयनतारा इनामदार ही भूमिका साकारत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘मोलकरीण बाई’, ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. टेलिव्हिजनवर सुपरहिट ठरलेल्या ‘अवघाचि संसार’ या मालिकेत सुद्धा त्या झळकल्या होत्या.
