टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग असतात, त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली असते. आता झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत लीप येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे.
‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ मालिकेत सात वर्षांचे लीप
झी मराठी वाहिनीने नुकताच इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला, अखेर सात वर्षांच्या संसारात नेत्राला सुख दिसू लागलंय, पण खोलवर दु:खानं ठाण मांडलंय, असे म्हटले आहे. नेत्रा आणि अद्वेतच्या मुलींचा वाढदिवस साजरा होत असून ती मनातल्या मनात म्हणते, “आता हे घर, हे कुटुंब किती सुखी आहे, छान झालंय सगळं, सगळ्यांच्यात एकोपा आहे.” मात्र, दुसरीकडे काकू कोणालातरी म्हणते, “केदारला कोणीच मनापासून शोधलं नाही याची सल आहे माझ्या मनात.” अद्वेतचा भाऊ आणि त्याची बायको फाल्गुनी बोलत असून ती म्हणते, “आपल्या बाळाला कोणीच वाचवू शकलं नाही, याचं दु:ख आजही आहे.” सात वर्षांनंतर काय गोष्ट असणार आहे, हे या प्रोमोमध्ये दाखवले आहे.
हा प्रोमो शेअर करताना, “नेत्राच्या सुखी संसाराची सात वर्षांनंतरची गोष्ट…!!’ अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे विरोचकानंतर नेत्राच्या कुटुंबामध्ये शतग्रीवची एन्ट्री झाली होती. शतग्रीवमुळे अद्वेतची आत्या इंद्राणी कोमात आहे. मात्र, शतग्रीव मैथिलीच्या शरीरातून बाहेर गेल्याने नेत्राने तिला माफ केले आणि पुन्हा घरी आणले. तिच्या घरात असण्याला घरातील इतर सदस्यांचा विरोध होता, मात्र नेत्राने तिला घरात ठेऊन घेतले. आता सात वर्षांनंतर मैथिलीदेखील नेत्राच्या कुटुंबात दिसत आहे.
आता सात वर्षांनंतर या मालिकेत काय बदल झाला आहे, इंद्राणीची भूमिका पुढे काय आहे, नक्की पुढची गोष्ट काय असणार आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. याबरोबरच शीतग्रीव त्यांच्या आयुष्यातून कायमचा निघून गेला आहे की परत येणार हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.