Bhagyashree Dalvi Kelvan : ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत ताराची भूमिका साकारणारी अभिनेत्री भाग्यश्री दळवी खऱ्या आयुष्यात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच भाग्यश्रीचा साखरपुडा थाटात पार पडला होता. अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे सुमेध म्हात्रे. त्याचं देखील मनोरंजन विश्वाशी खास कनेक्शन आहे.
सुमेध ‘स्टार प्रवाह’चा एक्झिक्युटिव्ह कंटेट प्रोड्युसर आहे. या दोघांची जवळपास १४ वर्षे मैत्री आहे अन् आता लवकरच भाग्यश्री-सुमेध साता जन्माचे सोबती होणार आहेत. सध्या या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच यांच्या कुटुंबीयांनी दोघांसाठी केळवण आयोजित केल्याचं पाहायला मिळालं होतं. आता नुकतंच यांचं केळवण ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या सेटवर सुद्धा पार पडलं.
भाग्यश्री आणि सुमेधची सेटवर एन्ट्री होताच सर्वांनी मिळून ‘Happy केळवण टू यू’ असं गाणं गाण्यास सुरुवात केली. आपल्या मित्रमंडळींचं हे एवढं प्रेम, त्यांनी प्लॅन केलेलं Surprise पाहून भाग्यश्री अन् सुमेध दोघंही भारावून गेले होते. त्यांचं सगळ्यांनी औक्षण केलं, यानंतर खास जेवणाचा बेत करण्यात आला होता. यावेळी सेटवर सिद्धार्थ जाधवही उपस्थित होता. याशिवाय धिंगाणाच्या सेटवर ‘सुम्याची भाग्या…. केळवण’ असं नाव लिहिलेलं मोठं पोस्टरही लावण्यात आलं होतं.
यावेळी भाग्यश्री उखाणा घेत म्हणाली, “धिंगाणाच्या सेटवर तुम्ही सगळ्यांनी मिळून दिलं आम्हाला केळवण, सुमेध रावांचं नाव घेते Let’s Have Fun!”
अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. भाग्यश्रीबद्दल सांगायचं झालं तर, ‘सावळ्याची जणू सावली’सह ‘दार उघड बये’, ‘सांग तू आहेस का?’, ‘खरंच तिचं काय चुकलं’ या मालिकांमध्येही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
