दैनंदिन मालिका असो किंवा सिनेमे…ऑनस्क्रीन वेगवेगळ्या नात्यांना जिवंत करणारे हे कलाकार, पडद्यामागेही तितकीच सुंदर आणि जिव्हाळ्याची मैत्री जपताना दिसतात. ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने झी मराठीच्या काही कलाकारांनी सहकलाकारांबरोबरच्या ऑनस्क्रीन बॉण्डिंगबद्दल मत व्यक्त केलं आहे.
‘सावळ्याची जणू सावली’मध्ये सावलीची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर म्हणाली, “आमच्या सेटवर माझ्या खास मैत्रिणी म्हणजे भाग्यश्री दळवी आणि मेघा धाडे. आम्ही तिघी बेस्ट फ्रेंड्स आहोत. सध्या आमचं शूटिंग एकत्र नसल्यामुळे मी त्यांना खूप मिस करते. दोन सीनच्या मध्ये कधीही वेळ मिळाला की आम्ही डान्स करतो, गेम्स खेळतो, रील्स बनवतो, खूप गप्पा मारतो, कधी सेटवर वेळ मिळाला की झोपून विश्रांती घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकत्र आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेतो.”
“भाग्यश्री आणि मेघा ताई दोघीही माझे खूप लाड करतात. आम्ही अनेकदा एकत्र डिनर डेटलाही जातो. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. मालिकेत भैरवी, सावली आणि तारा यांचं एकमेकांशी जमत नसलं, तरी खऱ्या आयुष्यात मेघा ताई आणि भाग्यश्री माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि आमची मैत्री खूप सुंदर आहे. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मला त्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि माझ्या आयुष्यात इतक्या छान मैत्रिणी असल्याबद्दल त्यांचे आभार मानायचे आहेत.” असं प्राप्तीने सांगितलं.
‘शुभ श्रावणी’ फेम वल्लरी विराज काय म्हणाली?
तसेच झी मराठीवर ‘शुभ श्रावणी’ ही मालिका सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री वल्लरी विराज प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वल्लरीने तिच्या सेटवर जुळलेल्या खास मैत्रीबद्दल सांगितलं. मालिकेत स्वीटीची भूमिका साकारणारी भूमिजा पाटील ही वल्लरीची सर्वात जवळची मैत्रीण आहे. याआधीही दोघींनी एकत्र काम केलं असल्याने त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली आहे. मोठे सीन किंवा लांबलचक संवाद असले की त्या एकमेकींकडून संवादांची तयारी करून देतात आणि प्रत्येक प्रसंगात एकमेकींना मदत करतात.
शूटिंगदरम्यान संध्याकाळी ५ वाजता ब्लॅक कॉफी आणि डार्क चॉकलेटचा आस्वाद घेणं हा वल्लरी आणि भूमिजाचा त्यांचा आवडता वेळ असतो. दोघींना एकाच प्रकारची गाणी आवडतात. मेकअप करताना गाणी ऐकणं, गप्पा मारणं आणि सेटवर मोकळ्या वेळेत एकत्र डान्स रील्स बनवणं या सगळ्याची या दोघींनाही प्रचंड आवड आहे. इतकंच नाही, तर अनेकदा त्या एकत्र सेटवर येतात आणि एकत्रच घरीही जातात. त्यामुळे भूमिजा शूटिंगला नसली की तिची खूप आठवण येते, अलं वल्लरी आवर्जून सांगते.
