Vedanti Bhosale Dance Video : ‘झी मराठी’च्या ड्रामा ज्युनिअर्स कार्यक्रमामुळे चिमुकली बालकलाकार वेदांती भोसले घराघरांत लोकप्रिय झाली. तिला या शोमुळे सगळे प्रेमाने ‘सातारी कंदीपेढा’ असंही म्हणतात. वेदांतीने सोशल मीडियावर अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात पसंती मिळवली आहे. सध्या ती ‘झी मराठी’च्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सावलीच्या मुलीची म्हणजेच ओवीची भूमिका साकारतेय. याशिवाय वेदांतीला डान्सची सुद्धा खूप आवड आहे. इन्स्टाग्रामवरील विविध ट्रेंडिंग गाण्यांवर ती सुंदर डान्स करताना दिसते.
वेदांती लहान असल्याने तिचे आई-वडील तिचं सोशल मीडिया अकाऊंट हँडल करतात. या चिमुकलीने नुकताच सर्वत्र ट्रेंडिंग असलेल्या ‘मस्कारा’ गाण्यावर डान्स केला आहे. ‘मैं वापस आऊंगा’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील हे ‘मस्कारा’ गाणं सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. या गाण्याला ए. आर. रहमान यांनी संगीत दिलं असून, मराठमोळी बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघ या गाण्यात झळकली आहे.
‘मस्कारा’ गाण्यावर गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी रील्स व्हिडीओ बनवत आहेत. वेदांतीने सुद्धा या गाण्यावर जबरदस्त एक्स्प्रेशन्स देत डान्स केला आहे. ‘किस मिस यारा लाए मस्कारा…’ असे या गाण्याचे बोल आहेत. चिमुकल्या वेदांतीने केलेल्या हुबेहूब डान्स स्टेप्स आणि तिच्या हटके एक्स्प्रेशन्सनी सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “गोडुली”, “अगं बाई किती ते गोड”, “आमची फेव्हरेट बालकलाकार”, “एक्स्प्रेशन क्वीन”, “ओय लाडोबा”, “फायर डान्स”, “प्रत्येक स्टेप भारी केलीये”, “क्युट वेदांती”, “मस्त वेदू”, “लाडुबाईंनी मस्त डान्स केलाय”, “सातारचा कंदीपेढा” अशा असंख्य कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, वेदांती भोसले सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत ओवी ही भूमिका साकारतेय. तिच्यासह या मालिकेत बालकलाकार साईराज केंद्रे सुद्धा अबीरच्या भूमिकेत झळकतोय. वेदांतीने या मालिकेपूर्वी ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. याशिवाय ही चिमुकली ‘लाफ्टर शेफ’ या हिंदी कार्यक्रमात सुद्धा झळकली होती. यावेळी वेदांतीने अभिनेत्री अंकिता लोखंडेची हुबेहूब नक्कल केली होती.
