Savalyachi Janu Savali fame Suprit Kadam Accident: ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. प्रत्येक पात्राचे एक वेगळेपण आहे. त्यामुळे या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे.
मालिकेत नील ही भूमिका अभिनेता सुप्रित कदमने साकारली आहे. अभिनेता आता त्याच्या भूमिकेमुळे नाही, तर तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला आहे.
“माझ्या हेल्मेटमुळे मी…”
सुप्रितने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या हाताला लागले असून, जखमा दिसत आहेत. त्याच्या हाताला जखमांचे व्रण आहेत. हा फोटो शेअर करत सुप्रितने लिहिले, “हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे कारण म्हणजे वांद्रे कार्टर रोडवर ७ फेब्रुवारी २०२६ ला संध्याकाळी ७ वाजता माझा अपघात झाला.”
पुढे त्याने लिहिले, “रस्त्यावरच्या लाईट्स गेलेल्या आणि एक काळ्या रंगाचा कुत्रा रस्ता क्रॉस करता करता माझ्या बाईकखाली आला. सांगायचा मुद्दा असा की, अपघात मोठा झाला; पण मी थोडक्यात बचावलो. माझ्या हेल्मेटमुळे मी वाचलो.”

सुप्रितने असेही लिहिले, “आपण कितीही गाडी सुरक्षितपणे चालवत असलो तरी समोरच्या कुठल्याही गोष्टीमुळे असे प्रसंग कधीही येऊ शकतात. हेल्मेटमुळे आपला जीव वाचू शकतो. कृपया हेल्मेट अनिवार्यपणे वापरा. धन्यवाद”, असे म्हणत हेल्मेट वापरण्याची अभिनेत्याने विनंती केली.
अभिनेत्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. सावळ्याची जणू सावली या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणारी सावली म्हणजेच अभिनेत्री प्राप्ती रेडकने सुप्रितच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले, “इतकं लागलंय तरी तू दररोज १४ तास शूटिंग करत आहेस. तुझं कौतुक आहे.” त्यावर सुप्रितने लिहिले, “जेव्हा तुम्हाला तुमचं काम आवडत असतं, तेव्हा ते काम सुरू राहिलं पाहिजे.”
भाग्यश्रीने लिहिले, “दादा, तू खूप स्ट्राँग आहेस. काळजी घे.” ”लक्ष्मी निवास’ फेम अनुज प्रभूने कमेंट करत लिहिले, “बापरे, काळजी घे”, अदिश वैद्यने लिहिले, “तू सुरक्षित आहेस, याचा आनंद आहे”, निषाद भोईरने लिहिले, “काळजी घे”, रुचिरने लिहिले, “काळजी घे”, कलाकारांसह अनेक चाहत्यांनीदेखील त्याला लवकर बरा हो, काळजी घे, असे कमेंट्समधून सांगितले आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सारंग व सावलीची गोष्ट पाहायला मिळते. विठुरायाची भक्त असणारी, गोड आवाज असणारी, प्रेमळ, शांत तितकीच खंबीर सावली या मालिकेत पाहायला मिळते. इतरांचा आदर करणारी, कुटुंबावर खूप प्रेम करणारी, अनेकदा संकटात सापडणारी, पण त्यातून मार्ग काढणारी सावली सगळ्यांना आपलेसे करते. या सगळ्यात तिला सारंगची साथ मिळते. तो वेळोवेळी तिची मदत करतो. तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो.
मालिकेत सुप्रितने सारंगच्या मोठ्या भावाची नील ही भूमिका साकारली आहे. नील हा शांत स्वभावाचा आहे. तो त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम करतो; मात्र त्याची पत्नी ऐश्वर्या मात्र कारस्थाने करताना दिसते. दरम्यान, आता मालिकेत पुढे काय घडणार याची प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागलेली असते.
