Zee Marathi Awards 2026 : झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात कलाकारांना नेहमीच गोड अन् अनपेक्षित सरप्राइजेस दिले जातात. यंदा लाडक्या लेकीचं कौतुक करण्यासाठी, खास तिला सरप्राइज देण्यासाठी प्राप्ती रेडकर म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या सावलीचे वडील अवॉर्ड शोमध्ये सहभागी झाले होते. ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी नायिका सावली ( प्राप्ती रेडकर ) खऱ्या आयुष्यात फक्त २२ वर्षांची आहे. अभिनयाच्या जोडीला तिने कराटे आणि किक बॉक्सिंग क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.
प्राप्तीने २०२२ मध्ये एका किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. याचा खास अनुभव तिने झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान सर्वांना सांगितला आहे. प्राप्ती खऱ्या आयुष्यात कराटे व किक बॉक्सिंग चॅम्पियन आहे हे समजल्यावर उपस्थित सगळ्याच कलाकारांनी तिचं भरभरून कौतुक केलं. या संपूर्ण प्रवासात वडिलांनी साथ दिल्याचं प्राप्तीने आवर्जून सांगितलं आणि त्याच क्षणी प्रत्यक्ष वडिलांना झी मराठीच्या मंचावर पाहून तिचे डोळे भरून आले.
प्राप्तीने बाबांना मिठी मारली आणि नंतर ती म्हणाली, “मी २०२२ पासून कराटे आणि किक बॉक्सिंग शिकतेय. २०२२ मध्ये चेन्नईत एक किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप झाली होती, त्यात मला गोल्ड मेडल मिळालं होतं. तेव्हापासून मग मला सगळी गोल्ड मेडलच मिळाली आहेत. या संपूर्ण प्रवासात डॅडींनी खूप साथ दिली. हे माझे डॅडी आहेत आणि ते अर्थात ते माझे सुपरहिरो आहेत. त्यांनी माझ्यासाठी सगळं काही केलंय. मी जे-जे मागितलंय ते मला त्यादिवशी दिलंय. मी आता २२ वर्षांची आहे, तरी अजूनही मी रोज त्यांच्या हातावर झोपते, आय जस्ट लव्ह हिम अ लॉट!” असं म्हणत प्राप्तीने तिच्या लाडक्या डॅडींचे आभार मानले.
यावेळी तेजश्री प्रधान आणि मेघा धाडे या अभिनेत्री सुद्धा भावुक झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच प्राप्तीच्या टॅलेंटबद्दल ऐकून अशोक सराफ, निवेदिता सराफ यांच्यासह अन्य ज्येष्ठ कलाकारांनी सुद्धा तिचं भरभरून कौतुक केलं.
दरम्यान, झी मराठी पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांना या भावनिक क्षणाची आणि बापलेकीच्या सुंदर नात्याची झलक पाहायला मिळणार आहे. ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता हा शो प्रसारित केला जाईल.
