‘सावळ्याची जणू सावली’ ही ‘झी मराठी’वरील मालिका सध्या दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाते. या मालिकेला वेळ बदलल्यानंतरही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सावलीने घराघरांतील प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. संगीत, गाणं हे ‘सावली’ या पात्राच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असून, त्याच संगीतामुळे मालिकेत तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे. जागतिक संगीत दिनानिमित्त सावलीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राप्ती रेडकरने संगीताशी असलेल्या आपल्या वैयक्तिक नात्याविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.

प्राप्ती म्हणाली, “माझे बाबा प्रवीण रेडकर गायक आहेत… ते लाइव्ह शोज करतात, त्यामुळे मलाही गायनाची आवड पहिल्यापासून होती. मी बाबा आणि माझ्या काकांबरोबर गावी असताना भजनाला जायचे… तेव्हा गाणं गायचे. आता अभिनय क्षेत्रात असल्यामुळे मी गायनाकडे फार इतकं लक्ष दिलं नाही. पण सावली ही भूमिका साकारताना मी संगीताच्या अजून जवळ पोहोचले. कारण सावलीला जो आवाज दिला आहे तो दिला आहे केतकी माटेगांवकरने आणि ती माझी वन ऑफ द आवडती गायिका आहे.

प्राप्ती पुढे म्हणाली, “आमच्या मालिकेत एक गाणं आहे ‘माझे माहेर पंढरी २.०’…. हे गाणं मालिकेत तेव्हा दाखवलं गेलं होतं, जेव्हा सावलीचं सत्य सर्वांसमोर येतं. सारंग आणि मेहेंदळे कुटुंबाला कळतं की, जो आवाज ते लोक इतके वर्ष ऐकत होते तो आवाज ताराचा नसून सावलीचा आहे. खरंतर, जेव्हा आम्ही हे गाणं शूट करत होतो तेव्हा मी खरोखरच रडत होते. प्राप्ती म्हणून मला सावलीबद्दल खूप वाईट वाटत होतं की, तिने आजवर इतकं सहन केलं आहे आणि आता तिला इतका प्रेम करणारा नवरा भेटला आहे. सारंगमुळे सावलीला प्रसिद्धी, ओळख मिळाली. या सर्व भावना अनुभवताना मला प्राप्ती म्हणून खूप रडायला येत होतं. ते गाणं माझ्या खूप जवळचं आहे.”

“तुम्हा सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा. संगीत किंवा गाणं म्हणजे एक थेरपी आहे, यामुळे माणसाच्या आयुष्यात खूप बदल होऊ शकतात. मी जेव्हा खूप आनंदात असते तेव्हा गाणी ऐकते, जेव्हा मी थोडी उदास असते किंवा राग येतो तेव्हाही गाणी ऐकते. प्रत्येक मूडमध्ये मी गाणी ऐकते आणि त्या गाण्यांशी रिलेट करते. सावलीला असंच प्रेम देत रहा. मालिकेला २ वर्षं झाली आहेत, पण प्रेक्षकांचं प्रेम आजही तितकंच आहे जितकं पहिल्या भागावेळी होतं.” अशा भावना प्राप्तीने व्यक्त केल्या आहेत.