Marathi Actress Answer To Troll : मनोरंजन विश्वातील कलाकारांना ट्रोलिंग काही नवीन नाही. कपडे, दिसणे यांवरून तर कायमच नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. विशेषत: अभिनेत्रींना अनेकदा त्यांच्या कपड्यांवरून नावं ठेवली जातात. ट्रोल केलं जातं. सोशल मीडियावरील या कमेंट्सकडे काही कलाकार दुर्लक्ष करतात; पण काही जण ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तरंही देतात.
कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना आता अनेक अभिनेत्री स्पष्टपणे उत्तर देतात. असंच काहीसं एका अभिनेत्रीबरोबर घडलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे मानसी सुरेश. मानसी सुरेश सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती कायमच तिचे खास फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
अशातच तिनं शेअर केलेल्या फोटोवर एका नेटकऱ्यानं कपड्यांवरून कमेंट केली आहे. या नेटकऱ्याला अभिनेत्रीनं चांगलंच सुनावलं आहे. नेटकऱ्याच्या कमेंटचा आणि त्यावर मानसीनं दिलेल्या उत्तराचा स्क्रीनशॉट तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. तसेच या स्टोरीद्वारे तिनं काय मग मुलींनो, कोण ठरवणार आपण कसे कपडे घालायचे ते, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्याला मानसी सुरेश म्हणाली…
एका नेटकऱ्यानं मानसीच्या फोटोवर कपड्यांबद्दल कमेंट केली, “एक काळ होता जेव्हा मावश्या साड्यांमध्ये दिसायच्या आणि लाड करायच्या, खाऊ घालायच्या आणि आजचा Trend… मॉडर्न मावश्या…”. त्यावर मानसी सुरेश हिनं नेटकऱ्याचा चांगलाच समाचार घेतलाय.
मानसीनं नेटकऱ्याच्या कमेंटला उत्तर देत म्हटलं, “एक काळ असा होता, जिथे पुरुष पांढरा सदरा आणि डोक्यावर पांढरी टोपी घालून फिरायचे. आता तुम्ही शर्ट-पँटमध्ये का दिसता हो? एक काळ होता, जेव्हा पुरुष शेतात राबायचा. तुम्ही कंपनीमध्ये जॉब का करताय? एका काळात पुरुष बाईचा खूप आदर करायचा आणि तुमचे विचार बघा, कपड्यांवरून तुम्ही मुलींना judge करणार? कोण आहात कोण तुम्ही? आणि राहिला प्रश्न साड्यांचा… आम्हाला साडीमध्येपण लढता येतं आणि शॉर्टससुद्धा.”
मानसीने ट्रोलरला उत्तर दिल्याचा स्क्रीनशॉट केला शेअर

यापुढे तिने “आता कंमेंट डिलिट करायची नाही हा…” असंही नेटकऱ्याला सुनावलं आहे. तसेच सगळ्यांच्या सगळ्या कमेंट्स वाचत असतो. प्रत्येकवेळी दुर्लक्ष करू असं नाही.”
दरम्यान, मानसी सुरेशच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती सध्या झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याआधी ती झी मराठीवरीलच ‘शिवा’ मालिकेत झळकली होती. तसेच स्टार प्रवाहवरील ‘स्वाभिमान’ मालिकेतही ती पहायला मिळाली होती. या मालिकांतील तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.
