Savalyachi Janu Savali Promo : ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत लवकरच सावली आपल्या पहिल्या गाण्याचं रेकॉर्डिंग पूर्ण करणार आहे. यात सावलीला साथ मिळणार आहे ‘मन धावतया…’ फेम प्रसिद्ध गायिका राधिका भिडेची. लवकरच राधिका मालिकेत एन्ट्री घेईल आणि सावलीच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात होईल. पण, या सगळ्यात भैरवी तिला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीये.
साउंड रेकॉर्डिंग करणाऱ्या मुलाशी हातमिळवणी करून सावलीचं गाणं कसं वाईट रेकॉर्ड होईल याकडे भैरवीचं लक्ष असतं. आता या कठीण प्रसंगावर सावली कशी मात करेल? यामध्ये राधिका तिला मदत करेल का हे मालिकेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण, त्याआधीच आणखी एक धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
मालिकेच्या या प्रोमोमध्ये सावली थेट सुरांच्या जुगलबंदीसाठी भैरवीला चॅलेंज देणार आहे. सावली आपल्याला आव्हान देतेय, हिची एवढी हिंमत कशी झाली असा प्रश्न भैरवीच्या मनात निर्माण होतो आणि ती रागात म्हणते, “जुगलबंदी ती सुद्धा तुझी अन् माझी? गुरू हा शिष्यापेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतो सावली…हे लक्षात ठेव.”
‘ती’ व्यक्ती सावलीच्या पाठिशी खंभीरपणे उभी राहणार
यावेळी सावलीच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहतो तिचा नवरा सारंग. तो भैरवीला म्हणतो, “आज सावली गाणारही आणि गरजणार सुद्धा…” आता पतीची साथ मिळाल्यावर सावलीचा आनंद गगनात मावेनासा होता. आता सारंग-सावली मिळून भैरवीला मात देणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. ‘गुरू शिष्य भिडणार…सुरांचा सामना गाजणार’ असं कॅप्शन देत झी मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा हा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड खूश झाले आहेत. आता या जुगलबंदीच्या निमित्ताने विठुरायाची आणखी सुंदर गाणी ऐकायला मिळतील अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये दिल्या आहेत.
दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका रोज सायंकाळी साडेसहा वाजता ‘झी मराठी’वर प्रसारित केली जाते. यामध्ये प्राप्ती रेडकर आणि साईंकित कामत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्राइम टाइम नसूनही या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

