Savalyachi Janu Savali upcoming twist: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील सावलीवर सतत कोणती ना कोणती संकटे येत असतात. तिच्याविरुद्ध सतत कोणीतरी कट-कारस्थान करते. तिच्याबद्दल तिच्या जवळच्या माणसांचाच गैरसमज होतो. तसेच, ती कितीही बरोबर असली तरीही तिला सतत अपमान सहन करावा लागतो.
या सगळ्यातून सावली मार्ग काढते, सत्य सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करते, जे कट-कारस्थान करतात, त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणते. पण, तरीही या सगळ्यानंतर ती पुन्हा कोणत्या तरी संकटात सापडते. आता मेहेंदळे कुटुंबावर दु:खद प्रसंग ओढवला आहे आणि त्याचा दोष तिलोत्तमा सावलीला देत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
तिलोत्तमाचे बोलणे ऐकून सावलीला बसणार धक्का
झी मराठी वाहिनीने, ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सावलीची वहिनी जयंती मेहेंदळेंच्या कुटुंबात येते. अमृताच्या हातात तिला बाळ दिसते. ती तिला म्हणते, “मेहेंदळेंचा वारस आहे, कोणासारखा दिसतोय, बघू”, असे म्हणून जयंती बाळाचा चेहरा पाहण्यासाठी पुढे जाते. तर तिला अमृताच्या हातात बाळ नसून बाहुली असल्याचे लक्षात येते. त्यानंतर ती अमृताला हसत म्हणते, “काय आहे हे? तू ही कुठली बाहुली आणलीस?”, अमृताला राग येतो. जयंतीचे केस पकडत ती म्हणते, “ही बाहुली नाही, माझं बाळ आहे.” अमृताचे ते रूप पाहून कुटुंबीयांना धक्का बसतो.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, तिलोत्तमा व सावली यांच्यात बोलणे सुरू आहे. सावली तिलोत्तमाला म्हणते, “वहिनींना सत्याची जाणीव करून द्यायला हवी.” त्यावर तिलोत्तमा म्हणते, “तू आधीच अमृताचं बाळ हिरावून घेतलं आहेस.” तिलोत्तमाचं बोलणे ऐकून सावलीला धक्का बसतो. ती “मी?”, असे म्हणते. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘अमृताचं बाळ हिरावण्यात खरंच सावलीचा आहे का दोष?’, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी म्हणाले…
मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केल्याचे कमेंट्सवरून पाहायला मिळत आहे. “ही मालिका बंद करा”, “काय फालतू ट्रॅकवर आणली आहे मालिका? भैरवीचं सर्व कारस्थान उघडकीस आणले, तिथपर्यंत ठीक होतं. हे काय आता नवीन? त्या देवाच्या पालकांचा शोध दाखवा, तिलोत्तमा अंधाऱ्या खोलीत जाऊन काय शोधून रडते, ते दाखवा. हे दाखवून उगाच वाढवले आहे. निव्वळ फालतूपणा. असं काहीतरी दाखवून प्रेक्षक बघत नाहीत. मग, ‘पारू’सारख्या मालिका अचानक बंद कराव्या लागतात. लेखकानं जरा विचार करावा”, “अप्पी आमची कलेक्टर २.०”, “सेम टू सेम अप्पी आमची कलेक्टर”, “मूर्खपणा नुसता”, ” मालिका आतापर्यंत मस्त चाललेली. आता नेहमीप्रमाणे करून टाकली. प्लीज तोच तोचपणा नको. कंटाळा येतो” अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.






मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सावली व अमृता मंदिरात जात असतात. अमृताला देवीला केलेला नवस पूर्ण करायचा असतो. त्यामुळे तिलोत्तमानं मनाई करूनही ती सावलीच्या मदतीनं मंदिरात जाण्यासाठी निघते. पण, भैरवी गुंडांना त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी सांगते. या सगळ्यात गरोदर असलेल्या अमृताला तिचे बाळ गमवावे लागते.
दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
